जळगाव : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजल्यानंतर महायुतीसह महाविकास आघाडीने पक्ष मेळावे, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा सपाटा लावला आहे. दरम्यान, चाळीसगावमधील सभेत बोलताना मंत्री संजय सावकारे यांनी मतदारांना आवाहन करतानाच भाजपची सत्ता न आल्यास काय गंभीर परिणाम होऊ शकतात, असा थेट इशारा दिल्याचे पाहायला मिळाले.

चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शास्त्रीनगर दुर्गामाता मंदिर परिसरातील प्रभाग क्रमांक चारसाठी भाजपच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी चाळीसगाव शहराच्या विकासासाठी भाजपची सत्ता येणे कसे गरजेचे आहे, या विषयी मंत्री संजय सावकारे बोलत होते. चाळीसगावच्या विकासासाठी आमदार मंगेश चव्हाण अहोरात्र मेहनत घेत आहेत. चाळीसगावचा चेहरामोहरा त्यांनी बदलवून टाकला आहे. येत्या चार ते पाच वर्षात चाळीसगाव शहरासाठी सुमारे एक हजार कोटींचा निधी आणण्याचा त्यांचा संकल्प आहे. मात्र, निधी आणण्याचा संकल्प तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा नगरपालिकेत नगराध्यक्षांसह भारतीय जनता पक्षाची बहुमताने सत्ता असेल, असेही मंत्री सावकारे जाहीर सभेत म्हणाले.

भारतीय राज्य घटनेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला स्वायत्त अधिकार आहेत. आमदार चव्हाण यांनी जरी निधीचा प्रस्ताव तयार केला, तरी त्याचा ठराव हा नगरपालिकेत बहुमताने मंजूर करावा लागतो. मी पहिल्या पंचवार्षिकला आमदार असताना भुसावळ नगरपालिकेत विरोधकांची सत्ता होती. त्यामुळे अनेक ठराव होत नव्हते. शासनाकडून निधी आणून देखील आडकाठी केली जात असल्याने शेवटी न्यायालयात जाऊन मला रस्त्यांची कामे करावी लागली. तुमचा निर्णय चुकला तर चाळीसगाव शहराचा विकास थांबेल. हा संघर्ष, हा कटू अनुभव चाळीसगावकरांना नको असेल तर नगरपालिकेत बहुमताने भाजपची सत्ता द्या, असेही आवाहन मंत्री सावकारे यांनी नागरिकांना केले.

दरम्यान, चाळीसगाव हे माझे कुटुंब समजून म्हणून मी काम करत आहे. माझ्या घराच्या कामात जसे माझे लक्ष असते, तसेच चाळीसगावच्या प्रत्येक विकास कामांमध्ये मी वैयक्तिक लक्ष देतो. आणि आज त्याची प्रचिती रस्ते, पूल, उद्याने आदी कामांच्या माध्यमातून येत आहे. केवळ शास्त्रीनगर परिसरामध्ये गेल्या तीन वर्षातच जवळपास २० ते २२ कामे, उद्याने, रस्त्यांची कामे केली आहेत. त्यापैकी जवळपास ७० ते ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. अशा पद्धतीने विकासाचे व निधी आणायचे कुणी जाहीर आश्वासन देत असेल तर तुम्ही जरूर त्याच्या मागे पाठीमागे उभे राहा, असे आमदार चव्हाण म्हणाले. यावेळी खासदार स्मिता वाघ, भाजप पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, शहराध्यक्ष नितीन पाटील, निवडणूक प्रभारी प्रा. सुनील निकम, माजी नगरसेवक पंडित चौधरी, प्रदीप देसले, आर. के. चौधरी, बाजार समितीचे उपसभापती शैलेंद्र पाटील, शरद मोराणकर, अशोक बागड, कपिल पाटील, संगीता गवळी, एकनाथ चौधरी, अविनाश चौधरी, हिरामण चौधरी, डॉ. महेंद्र राठोड, आदी उपस्थित होते.