नाशिक – शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात विरोधी पक्षांनी मोर्चा काढून भाजपवर टिकास्त्र सोडल्यानंतर आणि भाजपच्या तीनही आमदारांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर परिस्थिती मांडल्यानंतर चक्रे फिरली आणि शहर पोलिसांकडून गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला गेला. यामध्ये भाजपच्या काही नेत्यांशी संबंधित नातलग आणि अन्य पक्षीय नेत्यांनाही अटक झाली आहे. या घटनाक्रमामुळे आगामी महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना भाजपकडून तिकीट मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपच्यावतीने उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक पंचवटीतील स्वामी नारायण केंद्रातील सभागृहात पार पडली. यावेळी महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई चालविली आहे. यामध्ये गोळीबार प्रकरणात भाजप नेते सुनील बागूल यांचा पुतण्या गौरव बागूल, अलीकडेच भाजपवासी झालेल्या बाबासाहेब उर्फ मामा राजवाडे यांना अटक झाली. मागील दीड ते दोन महिन्यात वेगवेगळ्या प्रकरणात भाजपच्या दोन माजी नगरसेवकांवर कारवाई झाली.

नांदूरनाका येथे टोळक्याच्या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक झाली. तर, पंचवटीतील राहुलवाडी भागात सराईत गुन्हेगार सागर जाधव याच्यावर गुंडांनी गोळीबार केल्याच्या कटात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर भाजपचे महापालिकेतील माजी गटनेते जगदीश पाटील यांना पोलिसांनी अटक केली. या दोन्ही नगरसेवकांवर पक्षाकडून अद्याप कारवाई झालेली नाही. भाजपसह अन्य पक्षातील नेते, त्यांचे नातेवाईक वेगवेगळ्या प्रकरणात अडकत आहे.

या संदर्भात उपस्थित झालेल्याा प्रश्नावर महाजन यांनी गुंड कुठल्याही पक्षाचा असो, त्याची हयगय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. पोलीस गुन्हेगारांवर कारवाई करीत आहे. ते भाजपचे असले तरी त्यांची गय केली जाणार नाही. जो गुन्हा करेल, त्याच्यावर कारवाई होईल. पोलिसांना मुक्तहस्ते कारवाईला मुभा देण्यात आलेली आहे. त्यांच्या कामात कुणीही हस्तक्षेप करीत नाही. त्यामुळे भाजपशी संबंधित मंडळींवर कारवाई झाल्याकडे महाजन यांनी लक्ष वेधले.

महानगरपालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंडळींना तिकीट मिळेल का, या प्रश्नावर पक्षाकडून त्यावर विचार केला जाईल असे त्यांनी नमूद केले. आम्हाला नाशिक गुंडगिरीमुक्त शहर हवे आहे. टोळ्यांची दहशत संपवायची आहे. भाजपच्या ज्या दोन माजी नगरसेवकांवर अटकेची कारवाई झाली, त्यांच्यावर कारवाईचा निर्णय पक्ष प्रमुख, अध्यक्ष घेतील, असे महाजन यांनी सांगितले.