मालेगाव : कार्यकारी दंडाधिकारी म्हणून तहसीलदार यांनी आदेश दिलेला नसताना मालेगाव महापालिकेकडून एक हजारावर बेनामी लोकांना परस्पर जन्मदाखले वितरित करण्यात आल्याचा नवीन आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. हे दाखले मिळविणाऱ्यांमध्ये बांगलादेशी, रोहिंग्यांचा समावेश असण्याची शक्यता असल्याने हे कृत्य देशद्रोहाचे असल्याचा सूर देखील त्यांनी लावला.

सोमय्या यांनी मालेगावला भेट देत महापालिका आयुक्त रवींद्र जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक तेजबीरसिंग संधू यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर किल्ला पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी तक्रार केली. काही कारणास्तव वेळेवर जन्म नोंद होऊ न शकलेल्या नागरिकांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून तहसीलदार यांच्या आदेशान्वये विलंबाने जन्म दाखले देण्याची कार्यपद्धती आहे.

या कार्यपद्धतीचा गैरफायदा घेत वर्षभरात मालेगावातून मोठ्या प्रमाणावर बनावट जन्मदाखले वितरित झाल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती. त्यानुसार येथील छावणी पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पूर्वीच्या तीन प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे तहसीलदारांकडून आदेश प्राप्त करून जन्म दाखले मिळविले, या संशयावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे सुमारे तीन हजार जन्म दाखले रद्द करण्याची कारवाई देखील महसूल प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. आता नव्याने आरोप करताना तहसीलदारांकडून आदेश झालेला नसताना मालेगाव महापालिकेकडून एक हजारावर जन्मदाखले वितरित करण्यात आल्याचे सोमय्या यांचे म्हणणे आहे. यापैकी ४० जणांनी या जन्मदाखल्यांच्या आधारे पारपत्र मिळवले, असा दावा करुन या प्रकरणी महापालिकेतील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.