नाशिक – शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना शहरात भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर भाजपने आता ग्रामीण भागात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवळ आणि ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविणाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. याद्वारे भाजप आगामी निवडणुकांसाठी स्वबळाची तयारी करीत मित्रपक्षांना शह देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या घटनाक्रमावर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य करताना अजब दावा केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पक्षांतराला सुरुवात झाली आहे. सोमवारी सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे (शरद पवार) निवडणूक लढलेले उदय सांगळे आणि दिंडोरी विधानसभा निवडणूक लढणाऱ्या सुनिता चारोस्कर यांच्यासह माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सिन्नरचे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे ॲड. माणिकराव कोकाटे आणि दिंडोरीचे नरहरी झिरवळ हे मंत्री प्रतिनिधित्व करतात. उभयतांनी ज्यांना पराभूत केले, त्यांना भाजपने आपल्याकडे खेचले. या पक्षांतरात कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी महत्वाची भूमिका बजावली. यापूर्वी नाशिक शहरात शिवसेना ठाकरे गटाकडून शिवसेना शिंदे गटाकडे नेते व माजी नगरसेवकांचा जाणारा प्रवाह त्यांनी भाजपकडे वळवला होता. विधानसभेसह पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याच्या उद्देशाने भाजपने जोरदार तयारी चालविली असून मित्रपक्षांशी शह-काटशहाचे राजकारण खेळले जात आहे. या संदर्भातील प्रश्नावर महाजन यांनी भाष्य केले.
दिंडोरी आणि सिन्नरमधील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपला उपयोग होणार आहे. विरोधात असताना ही मंडळी गुण गातील, तारीफ करतील, असे अपेक्षित नाही. विरोधात असताना ते आमच्या विरोधातच बोलतील. त्यांना आता मुख्य प्रवाहात यावे असे वाटले. देशात भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांना पक्षात घेण्यास कोणाची हरकत नसावी, असे महाजन यांनी सूचित केले.
विधानसभेत उदय सांगळे आणि सुनिता चारोस्कर आमच्या विरोधात लढले, हे खरे आहे, परंतु, पक्ष प्रवेशावरून महायुतीत कुठल्याही भानगडी नाहीत. आम्ही शिवसेना (ठाकरे गट) राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचे जे असतील, त्यांना भाजपमध्ये घेत आहोत. त्यामुळे महायुतीच बळकट होणार असून आमच्यात कुठेही वाद नसल्याचा दावा महाजन यांनी केला.
