नाशिक – बांधकाम व्यावसायिकाने जागा रिकामी करुन मिळण्यासाठी कॉलेजरोडवरील वयस्कर दाम्पत्याच्या निवासस्थानी भाडोत्री गुंडांकडून दरोडा टाकण्याचा बनाव घडवून आणल्याचे उघड झाले आहे. संपूर्ण शहराला हादरविणाऱ्या आणि चीड आणणाऱ्या या घटनेतील सूत्रधार गुन्हे शाखा विभाग एकच्या पथकाने समोर आणला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील कॉलेज रोड हा उच्चभ्रु वस्तीचा भाग आहे. या रस्त्यावरील तपस्वी या बंगल्यात काही दिवसांपूर्वी दरोडा टाकण्यात आला होता. घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, डेबिट कॉर्ड, क्रेडिट कार्ड आदी मुद्देमाल चोरण्यात आला होता. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी सुरू केला. त्यासाठी पथक तैनात करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी केली असता तांत्रिक विश्लेषणातून दोन जणांची ओळख पटली. हे संशयित दुचाकीवर गाडगे पुलाखाली येणार असल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा >>> नाशिक : जप्त एक कोटीचा मुद्देमाल पोलिसांकडून तक्रारदारांना परत

पोलिसांनी सापळा रचत संदीप रणबावळे (रा. श्रीराम एम्पायर बिल्डर नमन शहा यांच्या साईटवर) आणि महादेव खंदारे (रा. कॉलेजरोड) यांना ताब्यात घेतले. त्यांची चाैकशी केली असता अरूण उर्फ बबन गायकवाड, नंदकिशोर रणबावळे आणि विधीसंघर्षित बालकाच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयितांच्या ताब्यातील दुचाकी, दोन भ्रमणध्वनी असा ७४ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संदीप रणबावळे याच्याकडे चौकशी केली असता विकासक (बिल्डर) अजित पवार याने दोन महिन्यापूर्वी कॉलेजरोड येथील तपस्वी बंगल्यात राहणाऱ्यांकडून घर खाली करून दिल्यास आठ ते १० टक्के दलाली दिली जाईल, अशी सुपारी दिल्याचे उघड झाले. त्याप्रमाणे संदीप रणबावळे याने सहकाऱ्यांसह तपस्वी बंगल्यात राहणारे वयोवृध्द आजी, आजोबा यांना प्राणघातक शस्त्राने मारहाण करुन घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम , डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड , बँकेचे कागदपत्र, पारपत्र, आधारकार्ड , मतदार कार्ड वगैरे बळजबरीने हिसकावले. पोलिसांनी संशयितांकडून एक लाख १४ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितासह विकास अजित पवार यालाही ताब्यात घेतले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Builder mastermind behind robbery on college road zws