नाशिक – कसमादे भागात अवकाळी व गारपिटीत कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. दीड महिना उलटूनही त्याची नुकसान भरपाई मिळाली नसताना दुसरीकडे सध्या कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे. यातून उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याची बाब व्यंगचित्राद्वारे मांडत सटाणा तहसीलदार कार्यालयासमोर कांदा प्रश्नी अनोखे आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र बापु पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्यंगचित्रकार किरण मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. व्यंगचित्राद्धारे एक एकर कांद्यासाठी येणाऱ्या खर्चासह प्रदर्शन मांडुन शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नाशिक : द्राक्षबागेवर घाव घालून नुकसान

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः बागलाण तालुक्यात येऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेट देऊन गेले. नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र दीड महिना उलटूनही अद्यापपर्यंत दमडीही मिळाली नाही. कांदा हे महत्त्वाचे पीक असून त्याला कवडीमोल भाव मिळत आहे, शेतकरी संघटीत नसल्याने त्याचा आवाज हा राज्यकर्त्यापर्यंत पोहचत नाही, हे आपले दुर्दैव आहे. या प्रश्नावर सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन लढा उभा केला पाहिजे असे मत शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र बापू पाटील यांनी उपोषणस्थळी बोलताना व्यक्त केले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव यांनीही लाक्षणिक उपोषण करुन जाहीर पाठिंबा दिला.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/05/onion-protest.mp4

अवकाळी पाऊस व गारपिटमुळे शेतात व चाळीत साठवलेला ६० टक्के कांदा खराब झाला आहे. मजुर लाऊन तो बाहेर फेकण्याची वेळ काही उत्पादकांवर आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. किरण मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी व्यंगचित्राद्धारे एक एकर कांद्यासाठी येणाऱ्या खर्चासह प्रदर्शन मांडुन सर्वांचे लक्ष वेधले. एक एकर कांद्याला एक लाख सात हजार रुपये खर्च येतो हे आकडेवारीसह व्यंगचित्राद्धारे दाखवण्यात आले आहे. बागलाण तालुक्याचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. नायब तहसीलदारांना प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. लोकप्रतिनिधींनी कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घातला जाईल असा इशारा देण्यात आला. बागलाण व देवळा तालुक्यातील बहुसंख्य कांदा उत्पादक आंदोलनात सहभागी झाले. कांदा हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. झोपेचे सोंग घेऊन बसलेल्या राज्यकर्त्यांना जागे करण्यासाठी व्यंगचित्रांचा आधार घेतल्याचे व्यंगचित्रकार मोरे यांनी म्हटले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cartoons now used in onion movement by farmers union zws