नाशिक – शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारी वेगवेगळे वळण घेऊ लागली आहे. पंचवटीतील म्हसरूळ-आडगाव लिंकरोडवरील ‘कॅटल हाऊस’ मल्टिकुझीन रेस्ट्रो व हुक्का पार्लर त्यासाठी पुन्हा एकदा चर्चेत आहे. पोलिसांनी याआधी दोनदा छापा टाकलेल्या या हुक्का पार्लरच्या चालकाने नाशिकमधील एका व्यावसायिक छायाचित्रकार तरुणीसह तिच्या मैत्रिणीला हाॅटेलमध्ये डांबून ठेवत बंदुकीचा धाक दाखवित शरीरसुखाची मागणी करण्याचा प्रकार उघड झाला आहे. इतकेच नव्हे तर, हाॅटेलमध्ये अनैतिक व्यवसाय केल्यास पैसे मिळतील, असा दबावही टाकला. या हाॅटेलचा चालक एका निवृत्त पोलीस उपअधीक्षकाचा मुलगा असल्याने तो कोणालाही आपल्या वडिलांचा पोलीस दलात कसा दरारा आहे, त्याची धमकी देतो.

कॅटल हाऊस’ हॉटेल  अवैध मद्यविक्री, हुक्का पार्लरमुळे वादग्रस्त आहे. तकारी आल्यावर पोलिसांनी काही वेळा छापा टाकून गुन्हेही दाखल केले आहेत. परंतु, काही दिवसानंतर पूर्वीचे उद्योग पुन्हा सुरु होत. त्यामुळे हे हाॅटेल कधी बंद पडेल, असे परिसरातील नागरिकांना वाटत होते. नाशिकमधील एक व्यावसायिक छायाचित्रकार युवती, तिची मैत्रीण आणि त्यांचा मित्र तन्मय पिसोळकर (रा. शिवाजीनगर, नाशिक) यांच्याकडून  मोहित ताम्हाणे या त्यांच्या मित्राने त्याला काम नसल्याने वेळोवेळी उसनवारीने पैसे घेतले होते. परंतु, त्याने पैसे परत न केल्याने तिघे मोहितच्या शोधात होते. २७ मे रोजी मोहित कॅटल हाऊस या हाॅटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिघेही मोटारीने रात्री हॉटेलात गेले.

मोहित दिसताच त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी पीडितेच्या ओळखीचा हॉटेलचालक सौरभ देशमुखने तिघांना शिवीगाळ केली. आपल्या हाॅटेलमध्ये कॉलगर्ल्स म्हणून काम केल्यास पैसे देईन, मोहितकडून पैसे मागण्याची गरज भासणार नाही, असा प्रस्ताव ठेवला. तिघे हाॅटेलमधून बाहेर पडू लागताच सौरभने बंदुकीचा धाक दाखवून पीडितेकडे आणि तिच्या मेत्रिणीकडे शरीरसुखाची मागणी केली. डांबून ठेवले. आपले वडील निवृत्त पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी)  असल्याने आपले कोणी काही करु शकत नाही, अशी धमकी दिली. मोहितने तिघांकडून २१ हजार रुपये काढून घेतले, पहाटे  तिघांना सोडून देण्यात आले.

भीतीमुळे तिघांनी कुठेही तक्रार केली नाही. परंतु, मोहितने व्हॉटसअपवरुन धमकी दिल्यानंतर २६ सप्टेंबर रोजी तिघांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून  हाॅटेल चालक सौरभ देशमुख याच्यासह मोहित ताम्हाणे यास  अटक केली. न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.