लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : शेतकऱ्याला आदिवासी विकास भवनातून अनुदानावर कमी पैशात ट्रॅक्टर घेऊन देण्याचे आमिष दाखवित ९१ हजार ५०० रुपयांना गंडा घातल्याच्या तक्रारीवरुन वणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या संशयिताविरोधात अभोणा पोलीस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल असून तेही त्याचा शोध घेत आहेत.

दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर येथील गणेश उर्फ बाळू गवळी हे शेतकरी असून मालवाहू वाहनातून माल वाहतुकीचाही व्यवसाय करतात. वणी येथील संदीप अवधूत (रा.दत्तनगर) याने शेगाव येथे पत्र्याची टपरी घेऊन जाण्यासाठी गवळी यांचेशी संपर्क साधला. टपरी घेऊन जाण्याचे १८ हजार रुपये वाहतूक भाडे ठरले. संपूर्ण रक्कम एकाचवेळी देतो, असे अवधूतने सांगितले .काम झाल्यानंतर गवळी यांनी पैशांची मागणी केली असता अवधूत टाळाटाळ करु लागला. काही दिवसांनी अवधूत आणि गवळी यांची वणी येथील के.आर.टी. महाविद्यालयाजवळ भेट झाली. त्यावेळी अवधूतने आदिवासी विकास भवनात आपली मोठ्या अधिकाऱ्याशी ओळख असून कमी किंमतीत अनुदानावर ट्रँक्टर घेऊन देण्याचे आमिष अवधूतने दिले.

आणखी वाचा-कांदा निर्यातीचा निर्णय तांत्रिक कारणांमुळे तीन दिवसांपासून अधांतरी

काही दिवसांनी अनुदानावर ट्रँक्टर पाहिजे असल्यास ५० हजार रुपयांसह अर्ज आदिवासी विकास भवनात द्यावा लागेल, असे सांगितले. ट्रॅक्टरची आवश्यकता असल्याने गवळी यांनी मे २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात संदिप शिंदे या साक्षीदारासमोर वणी बस स्थानकात अवधूत यांस ५० हजार रुपये दिले. आदिवासी विकास भवनातून अर्ज भरुन आणतो आणि स्वाक्षरी घेतो, असे अवधूतने सांगितले. बरेच दिवस उलटूनही अवधूत न आल्याने गवळी यांनी संपर्क साधून विचारणा केली असता ट्रँक्टरचे काम लवकरच होणार असून १० हजार रुपये फोन पे वर टाकण्यास सांगितले. त्याप्रमाणे १७ जून रोजी रक्कम गवळी यांनी टाकली. नंतर पुन्हा कल्याण कोटांबे याच्या फोन पेवर तीन हजार ५०० रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर अवधूतने पुन्हा संपर्क करुन ओमकार शिंदे याच्या फोन पेवर १० हजार रुपये फोन टाकण्यास सांगितले. गवळी यांनी १० हजार टाकले.

आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांवर आदिवासी आमदार नाराज, अनुसूचित जमातीत धनगर समाजाचा समावेश करण्यास विरोध

इतके पैसे दिल्यानंतरही काम न झाल्याने गवळी यांनी अवधूतकडे पैशांची मागणी केली. दरम्यान, अवधूतने आदिवासी शेतकऱ्यास दीड लाख रुपयांना फसवल्याची बातमी वाचण्यात आल्यावर गवळी यांनी वणी पोलिसांत फसवणूक झाल्याची तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी अवधूतविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, अभोणा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जिल्हा न्यायालया पाठोपाठ उच्च न्यायालयाने अवधूतचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने अभोणा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्यापाठोपाठ वणी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने अवधूतचे पाय खोलात गेले असून सुरगाणा तसेच अभोणा या दोन पोलीस ठाण्यात अवधूतविरोधात अजून दोन तक्रारी प्रलंबित आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheating with farmers by luring tractors on subsidy crimes against suspects in two police stations mrj