नाशिक: आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे खोटे सांगत माजी मंत्र्याच्या स्वीय सहायकाकडे दूरध्वनीद्वारे एक कोटीची मागणी करणाऱ्या संशयितास ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. त्याच्याकडून रोख रक्कम आणि रद्दी पेपर असा ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक संतोष गायकवाड यांच्याशी संशयिताने वेगवेगळ्या क्रमांकावरून संपर्क साधला. मी आयकर अधिकारी आहे. साहेबांच्या त्र्यंबकेश्वर, नाशिक येथील फार्म हाऊसवर माल ठेवलेला आहे. तेथे आयकर विभागाचा छापा पडणार आहे. त्या पथकात मी आहे. तुम्हाला मदत हवी असल्यास एक कोटी द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी संबंधिताने केली. गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकाराचा तपास सुरू केला. संशयिताच्या क्रमांकावर संपर्क साधला असता त्याने पैसे देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले. गुन्हे शाखेचे पथक नाशिककडे परतीच्या मार्गाला असतांना संशयिताने, मी करंजाळी येथील हॉटेल रितम व्हॅली येथे आहे. तुम्ही येथे या, असे दूरध्वनीवरुन सांगितल्यावर पथक त्या ठिकाणी रवाना झाले.

थोड्या वेळाने एक जण दुचाकीवर आला. त्याने स्वीय सहायक गायकवाड यांच्या मध्यस्थाकडे पैशांची मागणी केली असता पोलीस पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले. संशयिताने त्याचे नाव राहुल भुसारे (२७, रा. करंजाळी) असे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडील पैशांची बॅग आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ८५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास झाला.