लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: जिल्ह्यातील देवळा, कळवण, बागलाण आणि मालेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक घरांसह कुक्कुटपालन केंद्राचे पत्रे उडून गेले. वादळी पाऊस व वीज पडून पशुधनाचे नुकसान झाले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मागील २४ तासात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार देवळ्यातील पिंपळगाव येथील विश्वनाथ परदेशी आणि वाखारी येथे संतोष मळणे यांच्या घरावरील छत पडून नुकसान झाले. कळवण तालुक्यातील पिळकोस येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही घरांचे व कुक्कुटपालन केंद्राचे पत्रे उडून गेले. बागलाण तालुक्यात वादळ आल्याने काही घरांचे पत्रे उडाले. मालेगाव तालुक्यातील दसाने येथील सुरेश पवार यांचे वासरू वादळी पावसात मृत्यूमुखी पडले. बागलाण तालुक्यातील मौजे अजमिर सौदाणे येथे कैलास पवार यांच्या बकरीचा वीज पडून मृत्यू झाला. वादळात परिसरातील घरांचे पत्रे उडाले.