अनिकेत साठे, नाशिक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेल्जियमहून मुंबईत पोहोचलेले लॉर्ड इंडियाचे प्रमुख अधिकारी नंतर नाशिककडे रस्तेमार्गाने निघाले. ठाणे-भिवंडी वळणमार्गावर (बायपास) मानकोली, राजनोली परिसरातील अभूतपूर्व वाहतूक कोंडीत ते अडीच तास अडकले. दौऱ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे नाशिक येथील कारखान्यातील भेट रद्द करून शिष्टमंडळाला माघारी फिरावे लागले. वाहतूक कोंडीमुळे काय होत आहे त्याचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण. नाशिक-मुंबई महामार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो वाहनधारकांना उपरोक्त भागात दररोज वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. मानकोली जंक्शन, अंजूर फाटा आणि राजनोली कल्याण-भिवंडी फाटा या उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे ही समस्या अधिकाधिक गंभीर स्वरूप धारण करीत आहे. ‘एमएमआरडीए’च्या माहितीनुसार या दोन्ही उड्डाणपुलांचे काम मागील वर्षीच होणार होते; परंतु सद्य:स्थितीत ते बंद आहे. याविरोधात जबाबदार यंत्रणांना कायदेशीर नोटीस बजावत नाशिक फर्स्ट संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निश्चित केले आहे.

मुंबई-नाशिक चौपदरीकरणामुळे वाहतुकीचा वेग वाढला. मुंबईला ये-जा करणे सुलभ झाले. चौपदरीकरणावेळी भिवंडी वळण मार्ग आठपदरी करण्याचे नियोजन होते. तसेच अंजूर फाटा आणि कल्याण फाटा येथे उड्डाणपूल प्रस्तावित होता. ठाणे आणि भिवंडी शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या, परंतु रखडलेल्या महामार्ग विस्तारीकरणास २४ जानेवारीचा मुहूर्त लाभला आहे. केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे. तथापि, त्याआधीच सुरू झालेल्या उड्डाणपुलाच्या कामाची रडकथा कायम आहे. दोन्ही उड्डाणपुलांचे काम अतिशय संथपणे होत आहे. अंजूर फाटा येथे वाहतूक कित्येक तास ठप्प असते. त्यामुळे उद्योजक, परदेशी पाहुणे नाशिकला येण्यास उत्सुक नसतात. मुंबईहून नाशिकला विमानसेवा नसल्याने वाहतुकीतील अशा अडचणींमुळे नाशिकच्या विकासास बाधा येत असल्याचा मुद्दा वाहतूक विषयावर काम करणारी नाशिक फर्स्ट संस्था सातत्याने मांडत आहे.

एकाच कामात दोन वेगवेगळ्या सरकारी संस्थांवर जबाबदारी आली की, काय घडते त्याचे हे उदाहरण. महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचआय) अखत्यारीत आहे. त्याचे विस्तारीकरण प्राधिकरण करेल, तर याच मार्गावर रखडलेल्या उड्डाणपुलाची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडी) आहे. दोन-अडीच वर्षांपासून उड्डाणपुलाच्या संथ कामाबद्दल संस्थेने केंद्रीय भूपृष्ठमंत्र्यांपासून मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ), ठाणे, भिवंडी, नाशिकचे लोकप्रतिनिधी, एमएमआरडीए, एनएचआयचे अधिकारी अशा अनेकांकडे पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा केला. परंतु, कोणाकडूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही, अशी तक्रार नाशिक फर्स्टचे प्रमुख अभय कुलकर्णी यांनी केली आहे.

ज्या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, तेथील रस्त्यावर मोठे खड्डे आहेत. वाहतूक अस्ताव्यस्त होऊन कोंडी होते. त्यामुळे या भागातून मार्गस्थ होताना किती वेळ लागेल हे कोणी सांगू शकत नाही. याचा फटका नाशिकला बसत आहे. दीड ते दोन दशकांत नाशिकमध्ये एकाही मोठय़ा उद्योगाने गुंतवणूक केलेली नाही. कुशल मनुष्यबळ, पाणी, आल्हाददायक वातावरण असे असूनही उद्योग नाशिकमध्ये आले नाहीत. यामागे इतर शहरांशी नाशिक कसे जोडलेले आहे हे कारण महत्त्वाचे ठरले. महामार्ग विस्तारीकरणामुळे ठाणे परिसरातील उद्योजकांना नाशिकमध्ये गुंतवणुकीची संधी निर्माण झाली; परंतु महामार्गावरील अडथळे नाशिकच्या प्रगतीला मारक ठरत असल्याकडे कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.

तारीख पे तारीख

मानकोली जंक्शन आणि राजनोली जंक्शन येथील चारपदरी उड्डाणपूल केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाच्या सूचनेनुसार सहापदरी करण्यात आला. या बदलामुळे अतिरिक्त भूसंपादन करावे लागले. महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी मानकोली येथील उड्डाणपूल मे २०१७, तर राजनोली उड्डाणपूल डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. नंतर हे दोन्ही उड्डाणपूल ऑगस्ट २०१८ पर्यंत पूर्णत्वास जातील, असे एमएमआरडीने पत्राद्वारे सांगितले होते; पण त्या मुदतीत हे काम झाले नाही. संथपणे चाललेले काम नंतर ठप्प झाले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delay in flyover work near bhiwandi impact on the development of nashik