मालेगाव : येथील रेणुकादेवी सहकारी सूतगिरणी उभारणीसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेत घोटाळा केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना येथील न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी सकाळी हिरे यांना न्यायालयात उभे करण्यात आले, तेव्हा न्यायालयाबाहेर जमलेल्या त्यांच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.
येथील द्याने भागात उभारण्यात आलेल्या हिरे कुटुंबियांशी संबंधित सूतगिरणीसाठी १० वर्षापूर्वी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सात कोटी ४६ लाखाचे कर्ज घेण्यात आले होते. या कर्जाची परतफेड न झाल्याने थकबाकीची रक्कम ३१ कोटीच्यावर गेली. कर्जफेड न झाल्याने बँकेने सूतगिरणीची तारण मालमत्ता जप्ती आणि विक्रीची कारवाई सुरु केली. तेव्हा प्रकल्पाचे बांधकाम आणि यंत्रसामुग्री हे आराखड्यानुसार नसल्याचे तसेच सूतगिरणीसाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम हिरे कुटुंबाशी संबंधित व्यंकटेश सहकारी बँकेत वळती करण्यात आल्याची बाब बँकेच्या निदर्शनास आली. त्यामुळे गेल्या मार्च महिन्यात येथील रमजानपुरा पोलीस ठाण्यात या दोन्ही संस्थांच्या संचालकांविरुद्ध बँकेतर्फे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>नाशिक: दुचाकी चोरटे ताब्यात, आठ मोटारसायकल हस्तगत
या गुन्ह्यातील संशयितांमध्ये माजी मंत्री प्रशांत हिरे, स्मिता हिरे, अपूर्व हिरे, अद्वय हिरे अशा एकूण २७ जणांचा समावेश आहे. सूत गिरणीस कर्ज वाटप झाले, तेव्हा अद्वय हे जिल्हा बँकेचे अध्यक्षही होते. अद्वय वगळता अन्य सर्व संशयितांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. मात्र,अद्वय यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यामुळे अटकेसाठी पोलीस त्यांच्या मागावर होते. बुधवारी भल्या पहाटे भोपाळ येथील एका हाॅटेलमधून नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अद्वय यांना ताब्यात घेत अटक केली. रात्री मालेगाव येथे आणल्यावर प्रारंभी त्यांना काही काळ तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आले. नंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास रमजानपुरा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. गुरुवारी सकाळी त्यांना जिल्हा व अप्पर सत्र न्यायाधीश एस. यू. बघेले यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. कर्ज रकमेपेक्षा कमी किंमतीची मालमत्ता बँकेकडे तारण देण्यात आली व एकच मालमत्ता तीन वेळा तारण देऊन कर्ज घेण्यात आले, असे नमूद करत कर्ज फसवणुकीतील रकमेचा वापर कुठे केला गेला, याचा तपास करण्यासाठी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी फिर्यादी पक्षातर्फे करण्यात आली. तर राजकीय आकसातून हिरेंविरुध्द खोटा गुन्हा दाखल झाल्याचा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यावर न्यायालयाने त्यांना २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शिक्षण संस्थांच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणी हिरे कुटुंबियांविरोधात नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ३० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. यातील बहुतेक गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात मात्र एकमेव अद्वय यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे अटक होऊन पोलीस कोठडीत रवानगी झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.