धुळे : आपण डांबरट नाही. मतदार संघात आपण केलेली विकास कामे आहेत. आपल्यावर पक्षाचा विश्वास आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष आपणास तिसऱ्यांदाही उमेदवारी देईल आणि आपणच पुन्हा निवडून येऊ, असा विश्वास भाजपचे खासदार डाॅ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला. निवृत्ती म्हणजे राजकारण नव्हे, असा टोलाही भामरे यांनी भाजपमध्ये अलिकडेच प्रवेश केलेले निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांना हाणला. शहरातील मोहाडी उपनगर भागात असलेल्या दंडेवाले बाबा नगरमध्ये भामरे यांच्या हस्ते रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपमध्ये प्रवेश केलेले दिघावकर हे धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. दिघावकर यांचे त्या अनुषंगानेच जिल्ह्यात दौरे होत असल्याच्या संदर्भात खासदार भामरे यांना या कार्यक्रमाप्रसंगी विचारण्यात आले असता जेव्हा आपण लोकांना जिंकू शकत नाही, तेव्हा त्यांना भ्रमित करा, या सूत्रावर भ्रम निर्माण करत कपोलकल्पित बातम्या पसरवण्याची काहींना सवय असल्याची खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा : नाशिकमधील कोंडीवर मुबलक वाहनतळ, रुंद रस्त्यांचा तोडगा शक्य; शिवसेनेचे सर्वेक्षण मनपाकडे सादर

निवृत्ती म्हणजे राजकारण नव्हे. राजकारणात जनतेची कामे करावी लागतात. लोकमान्यता मिळवावी लागते. जो लोकमान्य असतो त्याला तिकीट मिळते. वशिलेवाल्यांना तिकीट मिळत नाही, असे भामरे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे महानगर शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापालिकेतील भाजपचे माजी सभागृह नेते नगरसेवक राजेश पवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhule bjp mp dr subhash bhamre criticize prataprao dighavkar who newly joined bjp says retirement is not politics css