धुळे : धुळे जिल्ह्यात दारूबंदीची मागणी पुन्हा एकदा जोर धरत असून, निवडणूक काळात वाढणाऱ्या दारू विक्रीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे. २ व ३ नोव्हेंबर रोजी शिंदखेडा तालुक्यातील रामपथारे येथे संघटनेचा विभागीय मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्यात अध्यक्षा सौ. गितांजली कोळी यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पदाधिकारी, महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी एकमताने ठराव पारित करून निवडणूक काळात दारू विक्री थांबविण्याची मागणी केली. मेळाव्यात ठरविण्यात आले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागात वैध-अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असते.
यामुळे दारू प्यायलेल्या व्यक्तींकडून रस्त्यांवर अश्लील भाषेचा वापर, मारामाऱ्या आणि महिलांबाबत गैरवर्तनाच्या घटना घडतात. त्यामुळे महिला मतदार मतदानासाठी बाहेर पडण्यास घाबरतात. याशिवाय काही राजकीय कार्यकर्ते मतदारांना दारू पाजून विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने मतदान करण्यास भाग पाडतात, असा गंभीर आरोप या मेळाव्यात करण्यात आला.
संघटनेने निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनास २१ नोव्हेंबरपूर्वी कठोर कारवाई करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. वैध दारू दुकानदारांकडून होणाऱ्या नियमबाह्य विक्रीवर नियंत्रण आणावे, नियमित तपासणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांचे परवाने तत्काळ रद्द करावेत, अशी मागणीही या ठरावात करण्यात आली. निवडणुका या शांत, भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडणे हे लोकशाहीचे मूलभूत तत्त्व असल्याने ही जबाबदारी प्रशासनाची आहे, असे गितांजली कोळी यांनी स्पष्ट केले.
मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमुखाने निर्णय घेतला की, जर प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर राज्यभर दारूबंदी आंदोलन तीव्र करण्यात येईल आणि निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही विचार केला जाईल. राज्यातील विविध जिल्ह्यांत जागरण मेळावे घेऊन लोकजागृती करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या मेळाव्यास दारूमुक्ती आंदोलनाचे राज्य संयोजक भाई रजनीकांत यांनी लेखी संदेश पाठवून पाठिंबा दर्शविला. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांनी या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
बैठकीत डॉ. सुजाता आडे, माजी श्री उमेश महाजन, कवी गुलाब मोरे, उषाताई काळे, सागर कोळी, तसेच उषाताई दावळे, मंगल मगरे, मंगलताई पाटील, अनिता कोळी, संगिता कोळी आणि विकास कुंवर या मान्यवरांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, धुळे शहर व शिंदखेडा तालुक्यातील महिला कार्यकर्त्यांनी पुढील हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रात दारूबंदी कायदा लागू करण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दारूबंदी महिला युवा मोर्चाच्या अध्यक्षा सौ. गितांजली कोळी यांनी या चळवळीला गती देण्यासाठी आगामी काळात विविध सामाजिक संघटनांशी संपर्क साधण्याची घोषणा केली.
