धुळे : जिल्ह्यात पुन्हा एक हृदयद्रावक घटना घडली. सोनगीर (ता.धुळे) येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने विद्यार्थ्यांमधील मानसिक तणाव, स्पर्धेचा दबाव आणि संवादाच्या अभावामुळे वाढणाऱ्या नैराश्याचा प्रश्न अधोरेखित केला आहे.
जयदीप सुनील पाटील (वय १९ वर्ष) रा. सोनगीर (ता.धुळे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. १ नोव्हेंबर रोजी रात्री जयदीपने विषारी द्रव्य प्रश्न केले. यानंतर त्याला धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान जयदीपचा ४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबारा वाजेला मृत्यू झाला. डॉ. ऋषिकेश देशमुख यांनी त्याला मृत घोषित करताच जयदीपच्या कुटुंबीयांचा आक्रोश सुरू झाला.
जयदीप पाटील (वय १९ वर्ष) हा नवोदय विद्यालयातील अत्यंत हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी होता अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा होती. गेल्या वर्षी त्याने राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा दिली होती, परंतु त्यात यश न मिळाल्याने तो निराश झाल्याचे सांगितले जाते. जयदीपचे वडील पदवीधर आहेत, तर त्याच्या दोन मोठ्या बहिणी प्रतिष्ठित संस्थांमध्ये कार्यरत आहेत. घरातील प्रत्येक सदस्य शिक्षण आणि प्रगतीशी निगडित आहेत. यामुळे संवादाचा अभाव आणि परीक्षेचा ताण या घटकांनी एक गुणी विद्यार्थ्याचे आयुष्य हिरावून घेतले अशी भावनिक चर्चा या घटनेच्या अनुषंगाने सुरू झाली.
या घटनेनंतर पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलतेने या घटनेसंदर्भात नोंद घेतली आणि जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे स्वतः आज मृत जयदीप याच्या घरी पोहोचले. धिवरे यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्याच्या पालकांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिस प्रशासनाकडून विद्यार्थ्यांसाठी मानसिक समुपदेशन आणि जनजागृती कार्यक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. धुळे जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध कारणांनी विद्यार्थीदशेतल्या युवकांच्या आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत. या अनुषंगाने सायबर, तणाव, पालकांचा अपेक्षेचा ताण आणि परीक्षेत अपयश अशा कारणांमुळे कारणांमुळे विद्यार्थी दशेतले युवक मानसिकदृष्ट्या कोसळत आहेत काय, यावर विचारमंथन होण्याची गरज व्यक्त होते आहे.
अशा घटनांचे सातत्य राहिल्यास जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक वातावरणावर भविष्यात मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, घरात नियमित संवाद आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. अपयशाला शेवट मानण्याऐवजी ते शिकण्याची संधी म्हणून स्वीकारणे ही गरज बनली आहे. पालकांनी मुलांच्या भावनिक स्थितीकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी दररोज संवाद साधावा, तसेच शाळा-महाविद्यालयांनीही नियमित समुपदेशन शिबिरे आयोजित करावीत, अशी अपेक्षा या घटनेच्या निमित्ताने व्यक्त होते आहे. याशिवाय जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून ‘युवा संवाद उपक्रम’ आणि ‘स्टुडंट हेल्पलाइन सेवा’ सुरू झाली तर अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना मोफत समुपदेशन, ताण व्यवस्थापन आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी विशेष सत्रे आयोजित केली जाऊ शकतात.
जयदीपच्या मृत्यूने संपूर्ण धुळे जिल्हा हादरला असून सामाजिक आणि शैक्षणिक वर्तुळात विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याविषयी गांभीर्याने चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक घरात संवाद, समजूतदारपणा आणि भावनिक आधार वाढविण्याची वेळ आली असल्याचे जाणकारांचे मत आहे. अशा घटना टाळण्यासाठी शासकीय यंत्रणा, शाळा-कॉलेज आणि पालक यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे हीच काळाची गरज असल्याचे यानिमित्त अधोरेखित झाले आहे.
