नाशिक – महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र आणि राज्य शासन विविध उपाययोजना राबवत असतांनाही महिलांवरील अत्याचाराचा आलेख उंचावत आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमधील महिला मदत कक्षांसाठी नवीन ४० दुचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले. महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने वेगवेगळ्या मदतवाहिनी, कायदे या माध्यमातून काम करण्यात येत आहे.

महिलांविरूध्दच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, गुन्हे उघडकीस आणणे व गुन्ह्यांचा तपास करणे तसेच महिलांविरूध्द अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला मदत कक्ष स्थापन करण्यात आले. महिला बळकटीकरणासाठी निर्भया फंड अंतर्गत नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरो यांच्याकडून प्राप्त निधी यासाठी वापरण्यात आला. या योजनेअंतर्गत महिलांविरूध्द तक्रारींना जलदगतीने प्रतिसाद मिळावा, यासाठी जिल्ह्यातील ४० पोलीस ठाण्यांमध्ये स्थापित करण्यात आलेल्या महिला मदत कक्षांसाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ४० दुचाकींचे वितरण करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपअधीक्षक नितीनकुमार गोकावे यासह इतर उपस्थित होते.

जिल्ह्यात अतिदुर्गम भाग, तालुकास्तर तसेच खेड्यापाड्यांवरील सर्व महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच महिला अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध होण्यासाठी ग्रामीण पोलीस दलातील महिला मदत कक्ष तत्परतेने कार्यरत असून महिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक पाटील यांनी केले आहे.

महिला मदत कक्षाचे स्वरुप

जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला मदत कक्षांमध्ये संगणक संच, भ्रमणध्वनी व उपयुक्त साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांच्या उपलब्धतेनुसार त्यांची नियुक्ती कक्षांमध्ये करण्यात येणार आहे. महिलांना शीघ्र मदत मिळावी, त्यांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण व्हावे, या करता दुचाकींचा उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.