नाशिक : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असतांना दिवाळीचा अविभाज्य भाग असलेला फराळ तयार करण्यासाठी महिला वर्गाची लगबग सुरू झाली आहे. एकिकडे किराणा मालाचे वाढलेले दर व्यावसायिकांसाठी सुगीचे दिवस असल्याचे संकेत देत असतांना याला शहर परिसरातील वाढलेल्या गुन्हेगारीचा अप्रत्यक्ष फटका बसत आहे. नाशिक पोलीस आणि महापालिकेने फलकबाजीला लगाम घातल्याने व्यावसायिकांपुढे अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

दिवाळी म्हटलं की फराळ हे अतुट नाते. शुक्रवारी वसुबारसने दिवाळीला सुरूवात होणार असून महिलांनी दिवाळी कामांना काही दिवस आधीपासूनच सुरुवात केली आहे. घरातील साफसफाईनंतर महिलांचा मोर्चा हा फराळ तयार करण्याकडे वळतो. तयार फराळाला काहींची पसंती मिळत असली तरी घरी जमेल तसा फराळ करण्याकडे अनेकांचा कल राहतो. या अनुषंगाने सध्या बाजारपेठेतील किराणा दुकांनामध्ये गर्दी वाढत आहे. महिनाभराचा किराणा आणि फराळासाठी लागणारे सामान यामुळे महिन्याचे अंदाजपत्रक कोलमडत असले तरी दिवाळीचा गोडवा कायम रहावा यासाठी होऊ द्या खर्च अशीच मानसिकता आहे.

फराळासाठी लागणाऱ्या खोबऱ्याचा दर मागील काही महिन्यांच्या तुलनेत कमी झाला असून ४४०-४७० रुपये किलो असा दर आहे. मात्र साखर तसेच तेलाचे दर चढे आहेत. याशिवाय महिला वर्गाचा ताण हलका करण्यासाठी तयार खोबऱ्याचा किस, गुळ पावडर, भाजणी चकली, फराळ तयार करण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे मसाले बाजारात उपलब्ध आहेत. किराणा मालाची होणारी खरेदी पाहता किराणा व्यापाऱ्यांकडून खास सवलती जाहीर होतात. यामध्ये एकूण देयकावर सवलत, एकावर एक वस्तु मोफत, आकर्षक भेटवस्तु असे पर्याय दिले जातात. मात्र मागील काही दिवसांपासून शहर पोलिसांकडून फलकबाजीला लगाम घातला जात आहे. याचा परिणाम व्यवसायावर होत असल्याची काही व्यावसायिकांची तक्रार आहे.

यंदा फलकबाजी करता न आल्याने नियमित ग्राहकांव्यतिरिक्त अन्य ग्राहकांना दुकानदारांना आकर्षित करता आले नाही. याविषयी रोशन सुपर मार्केटच्या वतीने माहिती देण्यात आली. एरवी ठिकठिकाणी फलक लावले जातात. त्यामुळे नवीन नाशिकसह शहराच्या वेगवेगळ्या भागातून ग्राहक येतात. यंदा नियमित ग्राहकांव्यतिरिक्त कोणी फिरकले नाही. त्यामुळे जादा माल भरलेला नाही. महापालिकेच्या धोरणाचा फटका बसल्याचे त्यांनी नमूद केले.

याविषयी किराणा माल व्यापारी प्रफुल्ल संचेती यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली. जाहिरातबाजी करावी लागत असेल तर हे व्यापाऱ्याचे अपयश आहे. आम्ही आमच्या काही वस्तुंमध्ये एकावर एक तर एकुण देयकावर सवलत दिली आहे. यंदाही ग्राहकांचा उत्साह कायम आहे. महिन्याचा किराणा तसेच फराळ तयार करण्यासाठी लागणारे जिन्नस असा सामान यामुळे एरवी होणाऱ्या खर्चात दुप्पट वाढ झाली. पण किराणा खरेदीवर याचा परिणाम नसल्याचे निरीक्षण त्यांनी मांडले.