धुळे : घरगुती ग्राहकांना २५ वर्षे मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे, मात्र यासाठी काही अटी आणि शर्ती ठरविण्यात आल्या आहेत. तुलनेने लाभार्थी मिळाले, तर धुळे जिल्हा हरित ऊर्जेच्या दिशेने मोठी झेप घेणार आहे.

या उपक्रमामुळे गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचा वीजबिलाचा भार कमी होऊन त्यांना मोठा दिलासा मिळेल. राज्य शासनाच्या “स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट)” या योजनेअंतर्गत गरीब आणि दुर्बल घटकांच्या घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात येणार आहे. या प्रकल्पातून दरमहा सरासरी १२० युनिट वीज निर्मिती होईल. त्यामुळे १०० युनिटपर्यंत वीज वापरणारे ग्राहक स्वतःची गरज भागवून उर्वरित वीज महावितरणला विकू शकतील. या प्रकल्पाद्वारे २५ वर्षे मोफत आणि शाश्वत विजेचा लाभ मिळणार असून, धुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात ऊर्जास्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू होईल.

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त अनुदानामुळे ग्राहकांना अतिशय कमी हिस्सा भरावा लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राबविण्यात येत असून, यासाठी ६५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर राबविली जाणार असून, पात्र ग्राहकांना ऑनलाइन आणि स्थानिक महावितरण कार्यालयातून अर्ज करता येणार आहे.

केंद्र सरकारच्या “प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना” अंतर्गत ग्राहकांना एक किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी ३० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. राज्य सरकारच्या स्मार्ट योजनेत या अनुदानाबरोबरच अतिरिक्त आर्थिक मदत मिळणार आहे. दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना केंद्राकडून ३० हजार आणि राज्य सरकारकडून १७,५०० रुपये, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील ग्राहकांना केंद्र अनुदानासह १० हजार रुपये, तर अनुसूचित जाती-जमातीतील ग्राहकांना १५ हजार रुपये अतिरिक्त अनुदान मिळणार आहे.

धुळे जिल्ह्यात सुमारे ७८ हजार घरगुती वीज ग्राहक हे १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरतात. त्यापैकी १९ हजार ग्राहक दारिद्र्य रेषेखालील असून, ५९ हजार आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटात मोडतात. महावितरणने या योजनेबाबत जनजागृती मोहीम सुरू केली असून, पात्र ग्राहकांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ही योजना यशस्वी ठरल्यास धुळे जिल्हा हरित ऊर्जा, सौर उत्पादन आणि ऊर्जाबचत क्षेत्रात राज्यात आघाडीवर राहील.