लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीची जागा आता नव्या गाड्यांनी घेण्यास सुरूवात केली आहे. महामंडळाच्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. नाशिक विभागात नुकत्याच दोन नव्या इलेक्ट्रिक बस इ-शिवाई दाखल झाल्या असून नाशिक-पुणे मार्गावर या बस धावणार आहेत.

सध्या महामंडळाच्या ताफ्यात ३०० हून अधिक बस आहेत. यात शिवशाहीचाही समावेश आहे. आता प्रवाश्यांच्या सेवेसाठी अत्याधुनिक सुविधांनीयुक्त अशी इ शिवाई ही इलेक्ट्रिक बस ताफ्यात दाखल झाली आहे. राज्यात औरंगाबाद, पुणे याठिकाणी ही बससेवा सुरू आहे. नाशिक येथील ठक्कर बझार (नवीन सीबीएस) स्थानकातून इ शिवाई बस पुण्यासाठी मार्गस्थ होईल. बसमध्ये ४५ आसनांची व्यवस्था असून दोन जागांच्या गटासाठी युएसबी स्वतंत्र चार्जर, वाहन आरोग्य देखरेख उपकरण, इन्फोटेन्मेंट आदी व्यवस्था देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत नाशिक विभागात दोन बस आल्या असून ही संख्या आठ ते नऊपर्यंत पोहचणार आहे.

हेही वाचा… नाशिक: आरोग्यवर्धक रानभाज्यांचा आस्वाद पालक मंत्र्यांच्या मर्जीवर; महोत्सवाच्या निर्धारित तारखेत बदल

या बस नाशिक-पुणे अशा दिवसाला १८ फेऱ्या करणार आहेत. वाहनांची दुरूस्ती देखभाल, वाहनचालक ही व्यवस्था खासगी तत्वावर ठेकेदाराकडे देण्यात आली आहे. नाशिक विभागात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बस चार्जिंग तपासणी करुन पुढील दोन दिवसात प्रवाश्यांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावतील. या संदर्भात आगारात चाचपणी सुरू आहे. शिवशाही बसच्या प्रवासी दरातच इ शिवाई ही बस सेवा सुरू राहणार आहे. प्रवाश्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: E shivai bus service soon on nashik pune route dvr