जळगाव : पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी सात वर्षांपासून तुरूंगात असलेला राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव उर्फ राजू पाटील याची पनवेल सत्र न्यायालयाने नुकतीच मुक्तता केली. त्यानंतर आता खडसे यांनी माझ्या भाच्याला भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरूनच अडचणीत आणले गेल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

अश्विनी बिद्रे यांच्या हत्याकांडात सहभाग असल्याच्या आरोपावरून एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव उर्फ राजू पाटील यास १० डिसेंबर २०१७ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर अनेकवेळा त्याचा जामीन फेटाळण्यात आला. मात्र, आता न्यायालयाने राजू पाटील यास निर्दोष ठरविल्याने खडसे कुटुंबाला दिलासा मिळाला. दरम्यान, बिद्रे यांच्या हत्याकांडात भाच्याचे नाव आल्याने विरोधकांनी त्यावेळी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली होती. खडसे त्यांच्या भाच्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यावेळी झाला होता. प्रत्यक्षात, सात वर्षे तुरूंगात काढल्यानंतर राजू पाटील याची एप्रिल महिन्यात पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.

राज्यातील कारागृहांना पुरवठा केल्या जाणाऱ्या निकृष्ठ अन्नधान्याची माहिती सात वर्षे तुरूंगात राहिलेल्या माझ्या भाच्यानेच मला दिली, असे वक्तव्य खडसे यांनी केल्यानंतर जळगावमध्ये पत्रकारांनी त्यांना तुमचा भाचा नेमका त्यात कसा अडकला होता. अशी विचारणा केली. तेव्हा, अश्निनी बिद्रे हत्याकांडाशी काही एक संबंध नसताना माझ्या भाच्याला अडकविण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यात भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांचा हात होता, असा दावा देखील त्यांनी केला.

बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि माझा भाचा राजू पाटील यांच्यात फक्त दीड मिनिटांचे संभाषण भ्रमणध्वनीवर झाले होते. त्यावरून माझ्या भाच्याचा कटात थेट सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आला. परिणामी, त्याच्या आयुष्याची सात वर्षे तुरूंगात गेली. आता न्यायालयानेच त्याची मुक्तता केली आहे. काही संबंध नसताना एखाद्याच्या आयुष्याशी खेळणे चुकीचे असल्याचे ताशेरे देखील न्यायालयाने तपास यंत्रणेवर ओढले आहेत, असेही खडसे म्हणाले.