लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक: राज्यात मराठा आरक्षणप्रश्नी लोकप्रतिनिधींविरोधात आंदोलक आक्रमक झाले असताना नाशिकमध्ये मात्र मराठा समाजातील शेतकऱ्यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांची भेट घेत जायकवाडीला पाणी न सोडण्याच्या त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले. जायकवाडीला पाणी दिल्यास शेती व्यवसायावर विपरित परिणाम होणार असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला.

आणखी वाचा-नाशिक: नवमतदार नोंदणीसाठी ५३ महाविद्यालयांशी करार, निवडणुकीत मतदानाची संधी

जायकवाडीसाठी नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून साडेआठ टीएमसीहून अधिक पाणी सोडण्याचे निर्देश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले आहेत. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असताना जायकवाडीसाठी पाणी सोडण्यास आमदार फरांदे यांनी विरोध दर्शविला आहे. नाशिकमधून पाणी जायकवाडीला दिल्यास एक लाख हेक्टरवरील फळबागा व शेतीचे नुकसान होईल. त्यामुळे जायकवाडीतील मृतसाठ्यातून पाच टीएमसी पाणी वापर करण्यास परवानगी देऊन पाण्याचा अपव्यय टाळता येईल याकडे फरांदे यांनी सरकारचे लक्ष वेधले. केवळ विरोध न नोंदवता फरादे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करत वस्तुस्थिती मांडली होती. या पार्श्वभूमीवर, सय्यदपिंप्री गावातील शेकडो मराठा शेतकऱ्यांनी आमदार फरांदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. पाणीप्रश्नी आम्ही आपल्यासोबत असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीचे वास्तव मांडले. यावेळी अनिल ढिकले, भाऊसाहेब ढिकले, शंकर ढिकले, मनोज जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers welcomed role of devyani farande on water issue mrj