जळगाव : शहरातील औद्योगिक वसाहतीत गोळीबारामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, रविवारी रात्री उशिरा कांचननगरात पुन्हा गोळीबार झाला. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. शनिपेठ पोलिसांनी रात्रीच एक जण ताब्यात घेतला असून, अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.
आकाश उर्फ टपऱ्या युवराज बाविस्कर (२९), असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गणेश रवींद्र सोनवणे (२८), तुषार रामसिंग सोनवणे (३०) आणि सागर सुधाकर सपकाळे (२४), अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींवर जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. कांचननगरातील विलास चौकात आकाश उर्फ डोया सपकाळे आणि सागर सपकाळे यांच्यात जुन्या वादातून रविवारी रात्री साधारणपणे साडेदहाच्या सुमारास बाचाबाची झाली. वाद जास्तच वाढल्यानंतर आकाश आणि त्याच्या सोबतच्या करण उर्फ तांडव राजपूत या दोघांनी गावठी बंदुकीतून बेछुट गोळीबार केला. त्यामुळे आकाश उर्फ टपऱ्या बाविस्कर याच्या छातीत एक गोळी घुसली. तशाच अवस्थेत त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
गोळीबारात गणेश सोनवणे, तुषार सोनवणे आणि सागर सपकाळे हे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांनाही तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, शनिपेठच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर तातडीने घटनास्थळी पोहोचले. स्थानिक गुन्हे शाखेसह शनिपेठ पोलिसांनी गोळीबारानंतर फरार संशयितांचा शोध सुरू केला. रात्री उशिरा आकाश उर्फ डोया याला ताब्यात घेऊन शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.
नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
जिल्ह्यात पोलिसांचा धाक न राहिल्याने खेळण्यातील बंदुकांप्रमाणे खऱ्याखुऱ्या बंदूक घेऊन फिरणाऱ्यांची संख्या अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतीत जी सेक्टरमध्ये अवैध दारू अड्ड्यावर एकाने केलेल्या गोळीबारात दोन तरुण कामगार जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली होती. पैकी एका कामगाराचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हल्लेखोर राहुल बऱ्हाटे आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथेही थट्टा मस्करी करत असताना एका तरुणाने समोरच्यावर बंदूक रोखली. मात्र, गोळी थेट छातीत घुसल्याने मोठा अनर्थ घडला होता. काही दिवसांपूर्वीही जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे आठ ते १० अज्ञात हल्लेखोरांनी कुरिअर सेवेत कार्यरत एका कर्मचाऱ्याच्या घरावर बेछुट गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. गावठी बंदुका घेऊन फिरणाऱ्यांची मजल थेट गोळीबारापर्यंत गेल्याने जळगाव जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती अलीकडे चिंताजनक बनली आहे. सामान्य नागरिकांमध्ये त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.
