लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव: राज्यात तापमानाचा पारा उंचावला असताना जिल्ह्यात सर्वाधिक तापमान नोंदविले जात आहे. भुसावळमध्ये आजीचा तेराव्याचा कार्यक्रम व १५ दिवसांपूर्वी जन्मलेल्या कन्येला पाहण्यासाठी पुणे येथून आलेले रेल्वेच्या कर्मचार्‍याचा उष्माघाताने मृत्यू झाला. गिरीश पाटील (२८) असे मृत कर्मचार्‍याचे नाव आहे. दरम्यान, आतापर्यंत उष्माघाताने पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

एप्रिलमध्ये वादळी वार्‍यासह अवकाळी पावसामुळे तापमानात काहीअंशी घट झाली होती. मेच्या सुरुवातीपासूनच राज्याचा पारा चढल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यातील सर्वांत उच्चांकी तापमानाची नोंद जळगाव, भुसावळ, चोपडा येथे झाली आहे. भुसावळमध्ये वैशाख वणवा पेटला आहे. सूर्य आग ओकत असल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. भुसावळ येथील रहिवासी व पुणे येथील रेल्वे कर्मचारी गिरीश पाटील यांच्या आजीच्या तेराव्याचा कार्यक्रम नुकताच झाला. तर १५ दिवसांपूर्वी त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले होते. त्यानिमित्त ते भुसावळमध्ये आले होते.

हेही वाचा… दहिवाळसह २६ गावांतील पाणी पुरवठा विस्कळीत, ग्रामस्थांचे आंदोलन

तेराव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर जामनेर तालुक्यातील सासरी गाडेगाव येथे कन्येला पाहण्यासाठी दुचाकीने गेले होते. तेथून परतल्यानंतर गिरीश पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले. सकाळी उलट्या होऊन पोटात दुखत होते. चक्कर येऊन कोसळले. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या बाबत डॉक्टरांनी दिलेल्या माहितीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा… नाशिक: ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकट गंभीर

पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा व नवजात मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, जिल्ह्याचे तापमान सरासरी ४५ अंशांपर्यंत पोहोचले आहे. खासगी रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. चाळीसगाव तालुक्यातील कजगाव येथे तरुणाचा, तर यावल तालुक्यातील मनवेल येथील शेतकर्‍याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे समोर आले. अक्षय सोनार (२९, कजगाव) असे तरुणाचे, तर हुकूमचंद पाटील (६७, मनवेल, यावल) असे शेतकर्‍याचे नाव आहे. याआधी पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील प्रेमसिंग चव्हाण (३६) आणि अमळनेर येथील रुपाली राजपूत (३३) यांचाही उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five people died due to heat stroke in jalgaon dvr