अन्नात किडे, पोळ्याही अर्धवट भाजलेल्या, वरणात कधी झुरळ तर कधी उंदीर पडलेला, असे जेवण आम्हांला नेहमीच दिले जाते. असे जेवण का करावे ? सकाळपासून दुपारी तीनपर्यंत आम्ही उपाशी असतांना कोणीच विचारायला आले नाही.
हेही वाचा- नवी मुंबई : परदेश वारी पडली महागात, चोरट्यांनी घर केले साफ, चार लाख २० हजारांचे दागिने लंपास
दररोजच्या त्याच त्या त्रासाला कंटाळलेल्या पंचवटीतील दिंडोरी रस्त्यावरील एकलव्य निवासी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या सहनशक्तीचा शुक्रवारी उद्रेक झाला. या शाळेत चौथी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी राहतात. ४०० विद्यार्थी शिकत आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे जेवण मिळत नसल्याची तक्रार आहे. आम्हांला १५ दिवसांपासून एकच भाजी मिळत असून पोळी कच्ची, भात कच्चा, असे सर्वकाही आहे. याविषयी आम्ही आमच्या प्रमुखांना माहिती दिल्यास ते दुर्लक्ष करतात. कधी वरणात झुरळ येतं तर कधी उंदीर. असे जेवण आम्ही कसे करु, अशी तक्रार उज्वला भोईर हिने केली.
हेही वाचा- जळगावात आजपासून बालगंधर्व संगीत महोत्सव
सकाळपासून दुपारी तीनपर्यंत आम्ही उपाशी आहोत. मात्र याविषयी कोणी बोलण्यास तयार नाही, असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाच्या ढिम्म भूमिकेचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांना देण्यात आलेले जेवण न करता वसतिगृहात खालील बाजूस ते बसून राहिले.
हेही वाचा- वनक्षेत्रातील निकृष्ट वनतळे कोरडेठाक, वन्य जीवांचे पाण्यावाचून हाल
याविषयी मुख्याध्यापक सुरेश देवरे यांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारी अंशत: खऱ्या असल्याचे मान्य केले. जेवणाचा दर्जा सुधारायला हवा. पोळ्या गरम गरम भरल्या जात असल्यामुळे त्या कच्चा वाटतात. भाज्यांमध्ये सातत्याने कडधान्य येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. हे जेवण मुंढेगाव येथील मध्यवर्ती स्वयंपाकघरातून (सेंट्रल किचन) येते. सध्या मुलांची परीक्षा सुरू आहे. वड्याचे तेल वांग्यावर काढले जात आहे. मुलांना पर्यायी जेवण उपलब्ध करून दिले असल्याचे त्यांनी सांगितले. सायंकाळी उशीरापर्यंत विद्यार्थी अन्नत्यागावर ठाम होते. विद्यार्थ्यांनी जेवण न घेता फळे खाण्यास प्राधान्य दिले. यावेळी आंदोलकांशी आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. मात्र आंदोलक आपल्या निर्णयावर ठाम राहिले.