जळगाव – बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले माजी महापौर ललित कोल्हे नऊ दिवसांपासून पोलीस कोठडीत होते. त्यानंतर आता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव कारागृहात पुरेशी जागा नसल्याच्या कारणावरून कोल्हे यांची थेट नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना माजी महापौर कोल्हे यांच्या ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाऊसवर बोगस कॉल सेंटर चालविले जात असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारे नखाते यांनी २८ सप्टेंबरला एल.के. फार्म हाऊसवर छापा टाकला असता, त्या ठिकाणी ३१ लॅपटॉप आणि कॉल सेंटरची आधुनिक यंत्रणा आढळून आली.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत सदरचे कॉल सेंटर खास करून विदेशी लोकांची फसवणूक करण्यासाठी सुरू केल्याचे स्पष्ट झाले. कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला अधिकृत एजंट असल्याचे सांगून डेटा चेक करण्याच्या बहाण्याने किंवा इतर आकर्षक आमिषे दाखवून परदेशी नागरिकांना गंडवित होते. दोन लॅपटॉपवर पैशांचे व्यवहारही झाल्याचे पोलिसांना आढळून आले होते.

ऑनलाईन फसवणुकीच्या उद्देशाने बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपावरून पोलिसांनी माजी महापौर कोल्हे आणि इतर संशयितांच्या विरोधात संघटित गुन्हेगारीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांर्तगत गुन्हा दाखल केला आहे. सर्व संशयितांना न्यायालयाने यापूर्वी बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्या कोठडीची मुदत संपल्यानंतर कोल्हे यांच्यासह अन्य संशयिताला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानुसार, कोल्हे यांनी जळगाव कारागृहात हलविण्याची व्यवस्था करण्यात आली.

मात्र, त्याठिकाणी आधीच बंद्यांची मोठी संख्या असल्याने पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत सायंकाळी उशिरा कोल्हे यांची नाशिक येथील कारागृहात रवानगी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस बंदोबस्तात नंतर कोल्हे यांना नाशिक नेण्यात आले. यावेळी राजकीय पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

पोलिसांनी बोगस कॉल सेंटर प्रकरणाच्या सखोल तपासासाठी बुधवारी संशयितांना न्यायालयीन कोठडी मागताना तपास करून नागरिकांना फसविण्यासाठी वापरलेल्या स्क्रिप्ट्स कोणी तयार केल्या, संशयितांनी फसवणूक करून मिळविलेली मोठी रक्कम त्यांनी कशी प्राप्त केली, ती रक्कम त्यांनी कुठे ठेवली, तसेच बनावट बँक खात्यांचा वापर केला गेला आहे का, कॉल सेंटर चालविण्यासाठी संशयितांचे विदेशात कोणी साथीदार आहेत का, यादृष्टीने आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा आणि गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारासह अन्य तीन जणांचा शोध घेणे बाकी असल्याची कारणे न्यायालयाला दिली. त्यामुळे सुनावणीअंती कोल्हे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.