मालेगाव : ईव्हीएम मॅनेज करून निवडणूक ‘सेट’ करता येते का, या विषयावरून सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत असल्याने वातावरण तापले आहे. याच अनुषंगाने इस्लाम पार्टीचे संस्थापक व येथील माजी आमदार आसिफ शेख यांनी मोठे विधान केले आहे. विधानसभा निवडणूक काळात निवडणूक ‘सेट’ करून देतो, असे सांगणारी दोन माणसे मालेगावात आली होती, असे सांगत या प्रकरणाचे पुढे काय झाले, हे स्पष्ट करणारा किस्सा त्यांनी ऐकवला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत ‘मत चोरी’ झाल्याचा आरोप केल्यानंतर राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. सत्ताधारी भाजप व त्यांच्या मित्र पक्षांकडून मात्र या सर्व खोट्या आणि कपोलकल्पित गोष्टी असल्याचे सांगून उलटपक्षी विरोधकांना ‘लक्ष्य’ केले जात आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे मतदार संघात भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना काँग्रेस उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडून धक्कादायक व निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. या मतदार संघात सहापैकी पाचही विधानसभा मतदार संघांमध्ये भाजपला एक लाख ९० हजार मतांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या बाजूला या मतदार संघांमध्ये पिछाडीवर असलेल्या काँग्रेसच्या झोळीत एकट्या मालेगाव मध्यमधून मात्र मतांचा अक्षरशः पाऊस पडला होता. या ठिकाणी डॉ. बच्छाव यांना एक लाख ९८ हजारावर मते पडली तर, डॉ.भामरेंना साडेचार हजाराचा टप्पाही गाठता आला नव्हता. एकट्या मालेगावमधून मिळालेल्या घसघशीत आघाडीमुळेच डॉ. बच्छावांना ३८०० मतांनी विजय प्राप्त करणे शक्य झाले होते. ईव्हीएम मॅनेज कसे करता येत नाही, याचे स्पष्टीकरण देण्यासाठी मालेगावचा हा दाखला सत्ताधाऱ्यांकडून हमखास दिला जातो.

याच अनुषंगाने मालेगावचे माजी आमदार व गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार आसिफ शेख यांनी कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत एक किस्सा सांगितला आहे. विधानसभा निवडणूक प्रचार ऐन भरात होता, तेव्हा आपल्याला भेटलेल्या सुटाबुटातल्या दोन व्यक्तींनी निवडणूक जिंकवून देतो म्हणून हमी देण्याचा प्रयत्न केला होता, असे ते म्हणाले. या गोष्टीस आपण नकार दिल्यावर आधी या व्यक्ती समाजवादी पार्टीच्या उमेदवाराकडे गेले, तेव्हा त्यांनी देखील नकार दिल्यानंतर दुसऱ्या एका उमेदवाराकडे त्या गेल्या होत्या, अशी माहिती मला नंतर समजली होती, असे शेख म्हणाले. त्या उमेदवाराचा नामोल्लेख टाळत, त्याच्या निकटवर्तीयांशी या व्यक्तींची चर्चा झाली होती. परंतु,निकाल लागला तेव्हा त्या उमेदवाराची पिछेहाट झाल्याचे तसेच अनामत रक्कम जप्त झाल्याचे दिसले, याकडे शेख यांनी लक्ष वेधले. अशा गोष्टींमध्ये काहीच तथ्य नसल्याने निवडणुका जिंकण्यासाठी जनमत आपल्याकडे वळविणे, हाच एकमेव मार्ग असतो, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.