नाशिक – कुंभमेळा नियोजनासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या कुंभमेळा मंत्री समितीच्या बैठकीला अखेर मुहूर्त लाभला. मंगळवारी मंत्रालयात कुंभमेळा मंंत्री समितीची पहिली बैठक कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यानिमित्ताने पालकमंत्री पदाच्या स्पर्धेतील महाजन यांच्यासह छगन भुजबळ, दादा भुसे, ॲड. माणिकराव कोकाटे हे चार मंत्री तसेच समितीतील अन्य तीन सदस्य मंत्री पहिल्यांदाच एकत्र आले. कुंभमेळा नियोजनात स्थानिक मंत्र्यांनी सहभागी होत विविध सूचना केल्या. पालकमंत्रीपदावरून महायुतीत बिनसले आहे. समितीच्या बैठकीमुळे कुंभमेळा नियोजनापासून दूर राहिलेल्या स्थानिक मंत्र्यांचाही सहभाग झाला आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे उत्कृष्ट व प्रभावी नियोजन करून नाशिकचा देशभरात लौकिक व्हावा, यावर बैठकीत मंथन झाले. यावेळी नाशिकच्या तीनही मंत्र्यांसह मंत्री समितीचे सदस्य उद्योगमंत्री उदय सामंत, पणनमंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याबरोबर समिती सदस्य नसणारे पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. नाशिकचा कुंभमेळा पावसाळ्यात होत असल्याने विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने सर्व शक्यतांची पडताळणी करून कार्यवाही करावी, असे निर्देश कुंभमेळामंत्री महाजन यांनी दिले.
सांडपाणी रोखण्यापासून उड्डाणपूल उभारणीपर्यंत सूचना
कुंभमेळा मंत्री समितीची स्थापना होऊन महिन्याहून अधिक कालावधी होऊनही बैठकीला मुहूर्त लाभत नव्हता. पालकमंत्रीपदाचा तिढा न सुटल्याने आणि कुंभमेळा मंत्री समितीची बैठक होत नसल्याने स्थानिक मंत्र्यांमध्ये अस्वस्थता होती. त्यामुळे जेव्हा या समितीची पहिली बैठक झाली, तेव्हा स्थानिक मंंत्र्यांमध्ये सूचनांची जणू स्पर्धा लागली. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ज्या सुविधा कुंभमेळ्याच्या निमित्ताने उपलब्ध होत आहेत, त्या कायमस्वरूपी नाशिककरांना उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टिकोनातून नियोजन होणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला.
गोदावरी नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्यावर देखील तातडीने कार्यवाही करून नदीपासून ते वेगळे करणे आवश्यक असून त्यावर प्राधान्याने कार्यवाही करावी, असे सूचित केले. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिक येथे नव्याने रुग्णालय उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगून ज्या सुविधा उभारण्यात येत आहेत, त्याचा वापर भविष्यात झाला पाहिजे. यासाठी प्रशासनाने नियोजन करावे, असे सूचित केले. जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र म्हणजेच सप्तशृंगी गड, सर्वतीर्थ टाकेद, कपिलधारा तीर्थ कावनई, तपोवन, राममंदिर इगतपुरी, यासह इतर पर्यटन क्षेत्राचा देखील विकास या निमित्ताने करावा, अशी सूचना केली. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी द्वारका ते नाशिक रोड उड्डाणपुलाबाबत प्रशासनाने तातडीने काम करावे, हे काम करताना जनतेला कोणती अडचण होणार नाही, त्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली.
