नाशिक – गिर्यारोहकांसह पर्यटकांना खुणावणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर येथे रज्जुमार्ग (रोप-वे) उभारण्यासाठी २५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. स्वातंत्र्यवीर राघोजी भांगरे यांचे स्मारक, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील अन्य रस्त्यांचे कॉक्रिटीकरण याद्वारे पर्यटन विकासाला चालना देण्याचे नियोजन आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी इगतपूरी तालुक्यातील भंडारदरावाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी याबाबत माहिती दिली. कळसूबाई शिखर येथे रज्जुमार्गासाठी २५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या भागात स्वातंत्र्यवीर राघोजी भांगरे यांचे भव्य स्मारक बांधण्यात येणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या दृष्टीने साकुर फाटा ते टाकेद पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जाईल. पर्यटन विकासाच्या माध्यमातून ग्रामस्थांना स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासाठी आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. भविष्यातील मोठे अधिकारी व सुजाण पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. शासनाकडून मिळालेल्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत त्यांना उत्तम ज्ञानदान शिक्षकांनी करावे. एम्पथी फाउंडेशने जिल्ह्यात ६५ शाळा निर्माण केल्या असून राज्यात त्यांचे योगदान मोठे असल्याचे कोकाटे यांनी सूचित केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वितरण करण्यात आले. मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या रोहित मदगे या युवकाचा सत्कार करण्यात आला. यावेळी एम्पथी फाउंडेशनचे विश्वस्त मितुल दमाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. आर. सुंदरेश्वरम, नीरव ठक्कर, जगदीश ठक्कर, मुख्याध्यापक रामदास कवठे, सरपंच संगीता घोरपडे आदी उपस्थित होते.

रज्जुमार्गाने मार्ग सुकर….

अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात कळसुबाई शिखर आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून रस्ते मार्गाने ते जवळ आहे. घोटी-भंडारदरा रस्त्यावर बाकी गावापासून कळसूबाई शिखराकडे जाण्याचा मार्ग आहे. सर्वात उंच शिखरावर भेट देण्यासाठी हजारो पर्यटक दरवर्षी येतात. ज्यांना या शिखरावर भेट देणे शक्य होत नाही, त्यांना रज्जुमार्गामुळे जाण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funds of rs 250 crores approved for construction of ropeway at kalsubai amy