जळगाव – शहरासह जिल्ह्यात गणेशाच्या आगमनानिमित्त सर्वत्र आनंदोत्सवाचे वातावरण आहे. बाजारपेठांमध्येही पूजा साहित्य, फुले, दुर्वा, मूर्ती सजावटीचे साहित्य यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक मंडळांना यंदा इच्छुक उमेदवारांकडून भरघोस देणग्या मिळाल्या आहेत. ज्यामुळे गणेश भक्तांचा आनंद आणखी द्विगुणीत झाला आहे.
निवडणुकीचा माहोल डोळ्यासमोर ठेवून सण-उत्सवांचा राजकीय रंग अधिकच गडद होताना दिसतो आहे. गणेशोत्सवासारख्या लोक भावनांना जोडलेल्या उत्सवाचा राजकीय नेते मंडळी तसेच इच्छुक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हुकमी एक्का म्हणून वापर करीत आहेत. लोकप्रतिनिधींसह इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते गणेश मंडळांना उदार मनाने देणग्या देत आहेत. काही ठिकाणी गणेश मूर्ती, प्रसाद, लाईटींग, साऊंड सिस्टीम, टी शर्ट वाटप करून विशेषतः तरूण मतदारांना जोडून ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच यंदा गणेश मंडळांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली असून, गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे जुळविण्याची चढाओढ सुरू झाली आहे.
गणेश मंडळांमध्ये शेकडोंच्या संख्येने तरुण कार्यकर्ते आणि कुटुंबीय मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यामुळेच या मंडळांचा पाठिंबा मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेसह पंचायत समिती तसेच महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका लढण्यास इच्छुक असलेले उमेदवार विशेष प्रयत्न करताना दिसत आहेत. वर्गणी गोळा करण्यासाठी येणाऱ्या मंडळांना नाराज न करता उलट त्यांना आनंदित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीचा वर्षाव केला जात आहे. यामुळे गणेशोत्सव हा धार्मिकतेबरोबरच राजकीय समीकरणे जुळविण्याचा एक महत्त्वाचा मंच ठरला आहे.
जळगाव जिल्ह्यात यंदा सुमारे दोन ९४६ गणेश मंडळांनी नोंदणी केली आहे. त्या पैकी २०८९ मंडळे सार्वजनिक तर ६९७ मंडळे खासगी स्वरूपाची आहेत. याशिवाय १६० गावांमध्ये एक गाव एक गणपती असणार आहे. कायदा सुव्यवस्थेची स्थिती अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती सर्व जय्यत तयारी देखील केली आहे. त्यानुसार, तीन पोलीस उपअधीक्षक, १० उपनिरीक्षक, १०० अंमलदार, एक एसआरपीएफ कंपनी आणि सुमारे १८०० गृह रक्षक दलाचे जवान (महिला आणि पुरुष) तैनात करण्यात आले आहेत. स्वतः पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी जातीने लक्ष ठेवून आहेत. गणेश मंडळांचा परिसर, मिरवणूक मार्ग, विसर्जन घाट आणि संवेदनशील ठिकाणी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनचा वापर करून सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यावर पोलीस प्रशासनाचा भर आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष गस्ती पथके तयार करण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त उत्सवादरम्यान होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.