नंदुरबार – तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद ए मिलाद शोभायात्रेवर यंदा नंदुरबार पोलीस दलाने अत्याधुनिक अशा क्यु सिक्स ड्रोनव्दारे नजर ठेवली. सामान्य ड्रोनपेक्षा उच्च क्षमतेचा आणि अतिसुक्ष्म गोष्टी टिपणारा हा ड्रोन जवळपास साठ लाख रुपयांचा असून यामार्फत पोलीस दलाने दोन्ही धार्मिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गणेश विसर्जन मिरवणूक ईद ए मिलाद शोभायात्रेवर  नंदुरबार पोलीस दलाने क्यु सिक्स ड्रोनव्दारे मिरवणूकींवर नजर ठेवली. त्यामुळे पोलीस दलाचे काम सोईस्कर झाले.

दंगलींचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबारमध्ये मागीलवर्षी गणेश विसर्जन मिरवणूकीनंतर निघालेल्या ईद ए मिलादच्या शोभायात्रेप्रसंगी दगडफेक होवून दंगल उसळली होती.  पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत दंगल नियंत्रीत केली होती. यंदा मात्र पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद ए मिलाद शोभायात्रेप्रसंगी कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी आधीच सावधगिरी बाळगली. चोख बंदोबस्त तैनात करत या दोन्ही मिरवणूकींच्या बारीक घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक ड्रोनचा वापर केला.

नंदुरबार पोलीस दलाने पहिल्यांदाच जिल्ह्यात क्यु सिक्स या अत्याधुनिक ड्रोनच्या माध्यमातून दोन्ही मिरवणूकींवर देखरेख ठेवली. गुप्तहेरीसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोनची क्षमता जास्त असून पाच  किलोपेक्षा याचे वजन कमी आहे. सात ते दहा किलोमीटरपर्यंत उडण्याची याची क्षमता आहे. सुमारे एक तासांचे बॅटरी पाठबळ (बॅकअप) असलेल्या या ड्रोनची किंमत ६० लाख रुपये इतकी असून या ड्रोनमध्ये बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या माध्यमातून दिवसा आणि रात्रीदेखील स्पष्ट चित्रीकरण होते. नंदुरबार शहरातील मध्यवर्ती भागातून हा ड्रोन उडवत संपूर्ण मिरवणूकीवर स्वत: पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस. यांनी देखरेख ठेवल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या ड्रोनशी वाईट हवामान, पाऊस किंवा इतर कारणांमुळे संपर्क तुटल्यास अवघ्या दोन मिनिटात हा पुन्हा आपल्या कार्यस्थळाबरोबर संपर्क करतो. किंवा ज्या जागेवरुन उड्डाण केलेले असते, त्या जागेवर पुन्हा उतरतो. या ड्रोनद्वारे देखरेख करुन पोलीस दलाने पहिल्यांदाच अत्याधुनिकेतेची कास धरल्याचे दिसून आले.

या ड्रोनच्या खरेदीचा प्रस्ताव पोलीस दलाकडे आला असता गणेश उत्सव मिरवणूक आणि ईद ए मिलादची शोभायात्रा यांच्या टेहळणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यास पोलीस दलाकडून संबंधित ड्रोन कंपनीला सांगण्यात आले होते. कंपनीकडून दोन्ही मिरवणुकांवेळी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यामुळेच ड्रोन खरेदीबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला असल्याचे पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस. यांनी सांगितले. मागच्या वर्षी दंगलीनंतर यंदा ईद ए मिलादची शोभायात्रा शांततेत पार पडली. गणेश उत्सवही निर्विघ्नपणे झाला.