नाशिक– चौसष्ट कलांचा अधिपती तसेच विद्याची देवता असलेल्या गणरायाचे आगमन झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मुंबई, पुण्यातील बहुसंख्य गणेश हे श्रीमंत या व्याख्येत बसणारे असले तरी नाशिकमधील काही सार्वजनिक गणेश मंडळांनीही गणरायाचे रुप खुलावे यासाठी गणरायाला सोन्या-चांदीचे दागिने घातले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये ३० पेक्षा अधिक मंडळांचे गणपती हे मौल्यवान ठरले आहेत.

नाशिकमध्ये मानाचा तसेच श्रीमंत असलेला गणपती म्हणून रविवार कारंजा गणेश मित्र मंडळाचा नंबर अग्रस्थानी आहे. मंडळाकडे सद्यस्थितीत १५१ किलो चांदीची गणेश मूर्ती तसेच १.२५ किलो वजनाचे चांदीचे दागिने आणि अन्य साहित्य, दोन किलो सोन्याचे दागिने असल्याची माहिती रोहन पवार यांनी दिली. उत्सव काळात तसेच वर्षभर या ठिकाणी सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे या माध्यमातून सुरक्षा जपली जाते. उत्सव काळात पोलीस बंदोबस्त असतो. पगडबंद लेन मित्र मंडळाकडील गणेश मंदिरात ५१ किलो चांदीची गणेश मूर्ती तसेच. १.५१ ग्रॅम सोन्याचे दागिने असल्याची माहिती मंडळाचे कन्हय्या आडगांवकर यांनी दिली.

गणेशोत्सव काळात पोलिसांच्या वतीने या ठिकाणी दोन हवालदार तैनात केले जातात. तसेच मंदिराचे सुरक्षारक्षक, सीसी टीव्हीच्या माध्यमातून दागिने आणि मूर्तीची काळजी घेतली जाते. दरवर्षी नवस करणाऱ्यांकडूनही चांदीचा मोदक, दुर्वा, हार असे अर्पण केले जाते. त्याची मोजणी गणेशोत्सव संपल्यानंतर केली जाते. देवळाली कॅम्प येथील वंदे मातरम संघटनेच्या मंडळाची ८.२५ तोळे वजनाची सोन्याची गणेश मूर्ती आहे. या मूर्तीत प्रतीवर्षी थोडीफार सोन्याची भर घातली जाते. उत्सव काळात मंडपात ही मूर्ती आरतीच्या वेळी आणली जाते. इतर वेळी ती पदाधिकाऱ्यांकडे असते.

तीळभांडेश्वर लेन मित्र मंडळाची ११ किलो चांदीची गणेश मूर्ती, १.५१ ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. नवनिर्माण कला आणि क्रीडा सांस्कृतिक मंडळाकडे ११ किलो चांदीची गणेश मूर्ती, पंचवटी येथील एस.एफ.सी. फाउंडेशन मित्र मंडळाकडे सहा किलो चांदीची मूर्ती असून ती बंदिस्त जागेत ठेवण्यात आली आहे. नवजीवन कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळ ट्रस्टकडे ७०० ग्रॅम चांदीची मूर्ती असून ही मूर्ती सायंकाळी मंडपात ठेवण्यात येते. घनकर लेनमधील सूर्यप्रकाश नवप्रकाश क्रीडा सांस्कृतिक मंडळाकडे ११ किलो चांदीची गणेश मूर्ती, अशोकस्तंभ येथील अशोकस्तंभ मित्र मंडळाकडे २१ किलो चांदीची मूर्ती आहे. मानाचा राजा मंडळाकडे सात किलो चांदी असून यामध्ये देवाचे पाय, हात, दात, बाळी, मूषक यांचा समावेश आहे.

भद्रकाली परिसरातील तिवंधा येथील साक्षी गणेश मंडळाकडे सोन्याचा हार आणि चांदीचे दागिने आहेत. शिवसेवा युवक मित्र मंडळाकडे सोन्याचे हार व चांदीचे दागिने, जाणता राजा मित्र मंडळाकडे चांदीचे दागिने, युवक उन्नती मित्र मंडळाकडे सोन्याचे दागिने, उत्कृष्ट मित्र मंडळाकडे चांदीचे दागिने व चांदीचा टोप आहे. रोकडोबा मित्र मंडळाकडे सोन्याचे दागिने, नवक्रांती मित्र मंडळाकडे ३४ किलो चांदीची मूर्ती आणि ४८ किलोचे सिंहासन आहे. सातपूर परिसरातील रजत नवश्या बहुउद्देशीय संस्थेच्या गणपती मंडळात २५ किलो चांदीची गणेश मूर्ती, बजरंग मित्र मंडळाकडे २.५ किलो चांदीची मूर्ती, अंबड येथील एकता विविध विकास सेवा संस्था गणेश मंडळाकडे पाच किलो चांदीची मूर्ती, श्रीकृष्ण कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाकडे ११ किलो चांदीची मूर्ती, दोन किलोचा उंदिर, दोन किलोचे सिंहासन आहे.

उपनगर येथील बालाजी फाउंडेशन रेजिमेंटल मंडळाकडे ३० किलो चांदीची मूर्ती , पाच ग्रॅम सोन्याचे दागिने. इच्छापूर्ती गणेश मंडळाकडे साडेपाच किलो वजनाची चांदीची मूर्ती, ईगल स्पोर्ट ॲण्ड सोशल क्लब मित्र मंडळाकडे २१ किलो चांदीची मूर्ती व प्रभावळ, छत्री, मुकूट अशी २६ किलो चांदी आहे. सौभाग्य मित्र मंडळाकडे ५.३६ ग्रॅम चांदीची मूर्ती आणि एक ग्रॅम सोन्याचे अलंकार आहेत. देवळाली कॅम्प परिसरातील विजय अमरदिप मित्र मंडळाकडे ११ किलो चांदीची मूर्ती, अभिनव मित्र मंडळाकडे ६.५ किलो चांदीची मूर्ती, हनुमान मित्र मंडळाकडे १.१४० ग्रॅम वजनाची चांदीची मूर्ती, तरूण उत्सव मंडळाकडे सात किलो चांदीचे अलंकार तर इच्छापूर्ती गणेश मंदिर ट्रस्टकडे दोन किलोची चांदीची गणेश मूर्ती आहे.