जळगाव – हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढा याच्याशी मंत्री गिरीश महाजन यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. तर लोढा हा महाजन यांना पेढा भरवितानाच्या छायाचित्राची सीबीआय चौकशी करण्याची मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर लोढा याने काय केले आहे किंवा काय केले नाही, याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. जो करेल तो भरेल, अशी प्रतिक्रिया मंत्री महाजन यांनी दिली आहे.

जामनेर तालुक्यातील मूळ रहिवाशी असलेल्या ६२ वर्षीय प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात मुंबईत साकीनाका पोलीस ठाण्यात तसेच अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातही पॉस्को, बलात्कार, खंडणीसह हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोढा हा सध्या भाजपमध्ये असून, पूर्वीपासून त्याचे आणि मंत्री गिरीश महाजन यांचे घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्याविषयी बोलताना मंत्री महाजन यांनी सोमवारी खडसे यांचे आरोप फेटाळून लावले. जामनेरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. प्रफुल्ल लोढा हा सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे. असा एकही पक्ष राहिलेला नाही की त्याने त्या पक्षात केला नाही, असे महाजन म्हणाले. पुरावा दाखल प्रफुल्ल लोढा याने शरद पवार यांच्यासह अजित पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत काढलेली छायाचित्रे त्यांनी भ्रमणध्वनीमध्ये दाखवली. माझ्यासोबतचे लोढा याचे जे छायाचित्र विरोधकांनी दाखविले आहे, ते १० वर्षांपूर्वीचे आहे. मी तेव्हा मंत्री असताना वाढदिवसाला तो आला असेल. त्यावेळेस पेढा भरवतानाचे ते छायाचित्र फोटो आहे, असा दावा मंत्री महाजन यांनी केला.

फक्त छायाचित्र आहेत म्हणून सुतावरून स्वर्ग गाठायचा हा विरोधकांचा सर्व प्रकार आहे. आता ज्या सर्वांसोबत प्रफुल लोढा याने छायाचित्रे काढली आहेत, त्या सर्वांची म्हणजे उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे यांची पण चौकशी करायची का? असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला. थोडा वेळ दिला तर मी एकनाथ खडसे यांच्यासोबतचे प्रफुल्ल लोढा याचे सुद्धा छायाचित्र दाखवतो. एकनाथ खडसे यांची मानसिकता खराब झाली आहे. प्रफुल्ल लोढाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी खडसे करतात. लोढा याने सुद्धा यापूर्वी निखिल खडसे यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. ती आत्महत्या आहे की हत्या,  हे मी म्हणत नाही. हे लोढा यानेच सांगितले आहे, असाही गौप्यस्फोट मंत्री महाजन यांनी केला.