जळगाव – आगामी कुंभमेळ्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाला महत्व प्राप्त झाले असले, तरी त्यावरून निर्माण झालेला तिढा अजुनही सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर, पालकमंत्रीपद जाहीर होऊनही निव्वळ शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) विरोधामुळे ते हातातून गेल्याने व्यथित झालेले मंत्री गिरीश महाजन यांनी येथे गुरूवारी त्याबाबतीत मोठे वक्तव्य केले.
जळगावमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जी. एच. रायसोनी महाविद्यालयातर्फे आयोजित युवारंग महोत्सवाचे उद्घाटन मंत्री महाजन यांनी केले. याप्रसंगी पत्रकारांनी त्यांना नाशिकच्या पालकमंत्रीपदाविषयी छेडले. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आता नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी रूजू झाले आहेत. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या सोयीसाठी त्यांची बदली नाशिकला करून घेतल्याची चर्चा त्यामुळे रंगली आहे. प्रसाद यांच्यानंतर नाशिकच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती देखील तुमच्या सोयीनुसार होणार आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. मात्र, मंत्री महाजन यांनी त्या विषयी बोलताना आपल्या मनातील उद्विग्नता बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
या प्रसंगी मंत्री महाजन यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची बदली त्यांच्या सोयीसाठी नाशिकला झाल्याच्या विरोधकांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले. राज्य शासनाने मंगळवारी सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. त्यानुसार, जळगावचे जिल्हाधिकारी प्रसाद आणि नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याही बदल्या करण्यात आल्या. दोन्ही आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एमपीडीए कायद्याचा बेजबाबदार वापर केल्याच्या ठपका ठेवत दोन लाखांचा दंड ठोठालेले जिल्हाधिकारी चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यानंतरही शासनाने त्यांची नाशिकला बदली केल्याने त्याचे विविध अर्थ लावले गेले. मात्र, मंत्री महाजन यांनी तसे काही नसल्याचे ठामपणे सांगितले.
दरम्यान, कुंभमेळ्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदास महत्व प्राप्त झाले असताना महायुतीतील तीनही पक्षांनी पालकमंत्रीपदाचा विषय प्रतिष्ठेचा केला. त्यासाठी भाजपकडून गिरीश महाजन, राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि ॲड. माणिक कोकाटे, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते मंत्री दादा भुसे ही मंडळी इच्छुक होती. बरीच ओढाताण होऊनही अखेर तोडगा निघाला नाही. महायुतीतील मतभेद कायम असताना आता पालकमंत्रीपदाच्या स्पर्धेतील चार मंत्र्यांना कुंभमेळा मंत्री समितीत स्थान देऊन खूश केले आहे.
अर्थात, या समितीचे प्रमुख कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हेच आहेत. पालकमंत्रीपदाच्या तिढ्यात प्राधिकरणाचे कामकाज या समितीच्या सल्ल्याने करण्याचा तोडगा काढला गेल्याचे मानले जात असले, तरी पालकमंत्रीपदाची इच्छा मंत्री महाजन यांच्यासह अन्य दिग्गज अजुनही बाळगून आहेत. त्याची प्रचिती जळगावमध्ये गुरूवारी मंत्री महाजन यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा आली. शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळेल तसेच लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे मिळतील, पण नाशिकच्या पालकमंत्रीपदाचे काही सांगता येत नाही, असे ते म्हणाले.