मालेगाव : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या जालिंदर नगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ हा जागतिक स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या जालिंदर नगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ हा जागतिक स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे.

लोकसहभागातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी जालिंदर नगरची शाळा प्रसिद्ध आहे. याच निकषावर स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या या शाळेला एक कोटीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सरकारी शाळेला जाहीर झालेला हा पुरस्कार महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब असल्याचे नमूद करत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या कामगिरीमुळे शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे.

जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या टी-४ या संस्थेतर्फे गेल्या जून महिन्यात घेतलेल्या ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राईज’या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत पहिल्या १० शाळांमध्ये येण्याचा मान जालिंदर नगर शाळेने पटकावला होता. ‘लोकसहभागातून शाळा विकास’ या स्पर्धेच्या विभागात शाळा सहभागी झाली. प्राप्त मानांकनानुसार जागतिक समुदायाने केलेल्या मतदानानंतर जालिंदर नगर शाळेची जगातील पहिल्या क्रमांकाची शाळा म्हणून मंगळवारी घोषणा करण्यात आली. लोकसहभागातून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल ही शाळा सर्वदूर प्रशंसनीय ठरली आहे. एका उजाड माळरानावर शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली मेहनत व त्याला गावकऱ्यांनी दिलेली साथ यामुळे या शाळेची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे, अशा शब्दात भुसे यांनी शाळेची प्रशंसा केली.

जालिंदर नगरच्या शाळेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे यांचे भ्रमणध्वनीच्या माध्यमातून अभिनंदन केले. यानंतर मालेगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जालिंदर नगरच्या जिल्हा परिषद शाळेने भारतीय शिक्षण पद्धतीला जगमान्य व बलिष्ठ करण्याचे काम केले असल्याचे गौरवोद्गार भुसे यांनी काढले. तसेच येत्या नोव्हेंबर महिन्याच्या १६ व १७ तारखेला अबुधाबी येथे होणाऱ्या विशेष समारंभात एक कोटी रुपयांचा पुरस्कार देऊन शाळेला गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती भुसे यांनी दिली.

जालिंदर नगर हे लहानसे खेडे आहे. पहिली ते चौथ्या इयत्तेपर्यंत तेथे शाळा असून पटसंख्या १२० आहे. विशेष म्हणजे या शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश घेण्यासाठी पालकांना प्रतीक्षा करावी लागत असते. एकीकडे सरकारी शाळांकडे पाठ फिरवत विद्यार्थी व पालकांचा खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल असताना या शाळेत प्रवेश मिळविणे पालकांच्या दृष्टीने जिकरिचे ठरते. अशा या नामांकित सरकारी शाळेने प्रगत देशातील खाजगी व अन्य सर्व शाळांवर मात करत नावलौकिक मिळवण्याची केलेली कामगिरी सरकारी शाळांची क्षमता सिद्ध करणारी आणि या शाळांचा आत्मविश्वास उंचावणारी आहे, असे भुसे म्हणाले. पत्रकार परिषदेला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ॲड.संजय दुसाने, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, माजी उपमहापौर नीलेश आहेर, सुनील देवरे,प्रमोद शुक्ला,रामा मिस्तरी, प्रमोद पाटील, विनोद वाघ आदी उपस्थित होते.