नाशिक : रविवारी नाशिकसह त्र्यंबकेश्वर परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने गोदावरीला पूर आला. हा पूर पाहण्यासाठी नाशिककरांनी गोदाकाठी गर्दी केली होती. या गर्दीत रविवारी सायंकाळी गाडगे महाराज पुलावरून गोदेला आलेल्या पुराची पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले. गर्दीमुळे त्यांच्या वाहनाला जागा मिळेनासे झाले होते.

रविवारी सकाळपासून नाशिक जिल्हा परिसरात पाऊस सुरू होता. नाशिकमध्ये धोकादायक पूरस्थिती असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला. रविवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम होता. गंगापूर धरण परिसरातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आणि त्यात सतत पडणारा पाऊस यामुळे गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढत गेली. या सर्व परिस्थितीचा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून आढावा घेत होते. सायंकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा आपल्या ताफ्यासह गोदाकाठची पूरस्थिती पाहण्यासाठी रामकुंड परिसरात आले. काही वेळ पाहणी केल्यानंतर गाडगे महाराज पुलावरून पुढे मार्गस्थ होत असतांना त्यांचे वाहन पुलावर वाहतूक कोंडीत अडकले.

गोदाकाठचा पूर पाहण्यासाठी नाशिककरांनी गाडगे महाराज पुलासह इतरत्र गर्दी केली होती. काही हौशी नाशिककर पुलावर उभे राहत फोटो काढण्यात मग्न होते. गोदावरीच्या पुराचे चित्रण करतांना नाशिककरांनी आपली वाहने पुलावर अस्ताव्यस्तपणे उभी केली होती. पुलाच्या दुतर्फा गर्दी आणि मध्ये वाहनांची रांग अशा विचित्र परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन अडकले.

विशेष म्हणजे, गोदावरीतील पाण्याची पातळी किती, यासाठी नाशिककरांकडून महत्व देण्यात येत असलेला दुतोंड्या मारूती बुडाला असतांना अग्निशमनसह अन्य विभाग मदत कार्यात असतांना धोकादायक गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस त्याठिकाणी नव्हते. याचा फटका जिल्हाधिकाऱ्यांना बसला. अर्ध्या तासाहून अधिक वेळानंतर त्यांची वाहतुक कोंडीतून सुटका झाली.