नाशिक – साधारणत: आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. शुक्रवारी दिवसभर संततधार सुरू होती. शनिवारी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. या दिवशी नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

जूनच्या प्रारंभापासून नाशिकमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. जवळपास दीड महिने तो सातत्याने कोसळला. हंगामाच्या प्रारंभीच्या कालखंडात असा पाऊस होण्याची ही मागील काही वर्षातील पहिलीच वेळ ठरली. मुसळधार पावसाने अनेकदा जनजीवन विस्कळीत झाले. प्रमुख धरणे तुडूंब भरण्याच्या स्थितीत पोहोचली. जुलैच्या मध्यावर त्याने काहीशी उघडीप घेतल्याने सूर्यदर्शन होऊ शकले. सलग आठ ते १० दिवसांपासून कायम राहिलेली ही स्थिती शुक्रवारी बदलली. बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. सकाळपासून संततधार सुरू झाली. काही ठिकाणी तीन ते चार तास पाऊस झाला. दुपारपासून सर्वत्र अंधार दाटला होता. नाशिक शहरात दिवसभरात १४.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

पावसामुळे काही धरणांच्या विसर्गात वाढ करण्यात आली. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार शुक्रवारी दारणा धरणातून ५१९८ क्युसेक, वालदेवी २४१, कडवा ४०६, करंजवण १००, वाकी ५६६, भावली ४८१, भाम १११९, नांदूरमध्यमेश्वर बंधारा १६१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला, शनिवारी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे.

उद्यापासून मध्यम पाऊस

२६ जुलै रोजी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. या दिवशी ३० ते ४० किलोमीटर प्रतिताशी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. २७ ते २९ जुलै हे तीन दिवस उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या घाट माथ्यावरील भाग वगळता इतरत्र मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.