मालेगाव : २९ सप्टेंबर २००६ रोजी मालेगावात झालेल्या बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची न्यायालयात निर्दोष मुक्तता होत असेल तर सहा निष्पापांचा बळी घेणाऱ्या त्या घटनेतील बॉम्ब आकाशातून आला होता की जमिनीतून,असा संतप्त प्रश्न एमआयएम पक्षाचे नेते, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी येथे उपस्थित केला आहे.

शहरातील भिकू चौकात झालेल्या या बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांच्यासह एकूण सात संशयितांची न्यायालयात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर मालेगावात तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर जलील यांनी मंगळवारी मालेगावला येऊन बळी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना या निकालाविषयी नाराजीचा सूर लावत राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या तपासाबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशात वारंवार घडणाऱ्या दहशतवादी कारवायांचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. परंतु अशाप्रकारे निकाल लागून संशयितांची मुक्तता होत असेल तर या यंत्रणेची गरज आहे का,असा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचे जलील यांनी नमूद केले.

मालेगाव बॉम्बस्फोट निकालाविरोधात अद्याप राज्य शासनाकडून उच्च न्यायालयात अपील न झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला. मुंबई लोकल बॉम्बस्फोटातील सर्व १२ मुस्लिम धर्मीय संशयितांची न्यायालयात निर्दोष मुक्तता झाल्यावर त्या विरोधात लागलीच उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. मात्र मालेगावच्या बाबतीत तसे न करता दूजाभाव करणारा आणि राजकीय निर्णय घेतला जात आहे,अशी टीका त्यांनी केली.

सत्ताधाऱ्यांकडून दहशतवादी घटनांकडे धार्मिक व राजकीय नजरेने बघणे चुकीचे आहे आणि ते देशासाठी घातक सुध्दा आहे. हे असेच सुरू राहिले तर अशा घटनांमध्ये बळी जाणाऱ्यांना न्याय मिळणार नाही तसेच अशा घटनांचा अंत देखील होणार नाही, असा इशारा जलील यांनी दिला. मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित असलेल्या साध्वी प्रज्ञा यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भोपाळमधून उमेदवारी देणे आणि खासदार म्हणून निवडून आणणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले सर्वात घाणेरडे राजकारण असल्याची टीका त्यांनी केली. न्यायालयाने आता निर्दोष मुक्तता केल्याने साध्वी यांना त्यांनी देशाचे पंतप्रधान केले तरी आम्हाला काही देणे घेणे नाही, असा उपरोधिक टोला देखील जलील यांनी लगावला.