धुळे : गैरहजर कर्मचाऱ्यांची रजा बिनपगारी करण्याची पूर्वसूचना देत त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार याप्रमाणे पाच हजार रुपये लाच स्वीकारतांना राज्य राखीव पोलीस दल गटाचे सहायक समादेशक तथा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पारसकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे येथील पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे राज्य राखीव पोलीस दल गट कमांक सहा अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलात सुश्रुषा (नर्सिंग) अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यासह इतर पाच महिला अधिकारी १४ आणि १५ एप्रिल रोजी गैरहजर होते. पारसकर यांनी या कर्मचाऱ्यांकडून गैरहजेरीबाबत खुलासा मागितला होता. ही रजा बिनपगारी करण्याची पूर्वसूचना त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्याने ते पारसकर यांना भेटले. त्यानंतर पारसकर यांनी त्या सर्व कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपयाप्रमाणे एकूण पाच हजार रुपये आणून द्यावेत, असे संबंधित तक्रारदार यांना सुचविले. असे न केल्यास सर्वांची रजा बिनपगारी करण्याची तंबी दिली. या अनपेक्षित मागणीमुळे २० एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात धाव घेत तक्रारदराने रीतसर तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केल्यावर पारसकर यांनी तक्रारदारांकडे गैरहजर कर्मचाऱ्यांकडुन प्रत्येकी एक हजार रुपयाप्रमाणे पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे उघड झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळ्याची तयारी केली.

हेही वाचा : नाशिक महानगरपालिकेला मातृभाषेतील शिक्षणाचे वावडे, प्रत्येक शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची सूचना

पारसकर यांच्या नकाणे रोडवरील एस. आर.पी. कॉलनीत असलेल्या राहत्या घरीच सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून पारसकर हे लाचेची रक्कम स्वीकारत असतांनाच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कारवाई होत असल्याचा संशय आला. यामुळे त्यांनी लाचेची रक्कम खाली टाकून दिली. परंतु, अधिकाऱ्यांनी त्याचवेळी त्यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा : नाशिकमध्ये ‘वंचित’तर्फे करण गायकर उमेदवार

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागूल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात पारसकरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.