नाशिक : पटसंख्या वाढविण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने किती विद्यार्थी दाखल केले, याची यादी सादर करा. उन्हाळी सुट्टीत पुढील वर्षाचे परिपूर्ण नियोजन करा, या काळात पूर्वपरवानगीशिवाय कुणालाही मुख्यालय सोडता येणार नाही. सुट्टीत शाळांची स्वच्छता सुरू ठेवा. किरकोळ दुरुस्तीची कामे मार्गी लावा. शाळेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेबाहेर जाऊन गप्पा ठोकू नका. आपल्या स्वार्थासाठी प्रसार माध्यमांचा वापर करू नका. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इंग्रजी व खासगी शाळांशी स्पर्धा करण्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक शाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करणे आवश्यक आहे. त्यास विरोध करणाऱ्या शिक्षकांची माहिती कळवा…

महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत २१ कलमी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. महानगरपालिकेच्या शहरात ८८ प्राथमिक आणि १२ माध्यमिक शाळा असून या ठिकाणी दोन्ही मिळून ३० हजार ४६२ विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळांची जबाबदारी एक हजारहून अधिक शिक्षकांवर आहे. निकालाची लगबग सुरू असताना शिक्षणाधिकाऱ्यांकडून दररोज सूचनांचा भडिमार सुरू असल्याने शिक्षक वर्ग त्रस्तावला आहे. काही दिवसांपूर्वी पाटील यांनी सूचनांची लांबलचक यादी पाठवली. शिक्षण विभागाकडून सर्व शाळा सेमी इंग्रजी करण्याचा अट्टाहास धरला जात आहे. शहरात मनपाच्या मराठी माध्यम प्राथमिकच्या ७३, हिंदी माध्यमातील चार तर उर्दू माध्यमाच्या ११ शाळा आहेत. माध्यमिकची १० मराठी व दोन उर्दू विद्यालयांचा समावेश आहे. प्रत्येक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीचे सेमी इंग्रजीचे वर्ग असणारी शाळा होणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी

इयत्ता पाचवी ते आठवीसाठी शासनाने नापास करण्याचे धोरण निश्चित केल्याने त्या निकालास केंद्रप्रमुख व शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून मनपातील प्रत्येक शिक्षकाने पाठ टाचण काढणे आवश्यक आहे सर्व मुख्याध्यापकांनी दोन मे रोजी आपल्या शाळांची वर्ग वाटणी करावी. शिक्षकांनी घटक नियोजन, वार्षिक नियोजन, वर्गाचे वेळापत्रक, शिक्षक परिचय, वर्षभरातील उपक्रम आदींचे नियोजन करावे. १५ जून रोजी प्रत्येक शाळेत नवागतांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वाटप, आदी कार्यक्रम आयोजित करावे लागतील. पुढील शैक्षणिक वर्षात शिक्षकांना वर्गांमध्ये भ्रमणध्वनी वापरास बंदी असणार आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांसाठी होईल. आपल्या शाळेबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया आणि वर्तमापत्राद्वारे बदनामी होईल, असे कृत्य होणार नाही याची काळजी घ्यावी. स्वार्थासाठी पत्रकार, इलेक्ट्राॅनिक माध्यमांचा वापर करू नये, असे पाटील यांनी सूचित केले आहे.

शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांनी दोन दिवस अगोदर येऊन शाळा स्वच्छ करावी, इयत्ता चौथी व सातवीचे दाखले अन्य शाळेस देऊ नये. कारण आपण पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरू करीत आहोत. अनेक ठिकाणी शिपाई, सुरक्षा रक्षकांना मुख्याध्यापक खासगी कामे लावतात, असा अहवाल आला आहे. संबंधितावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असल्याने काही शिक्षक वर्ग सोडून ज्या ठिकाणी कॅमेरे नाहीत, अशा ठिकाणी एकत्र जाऊन गप्पा मारतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. वर्गात विद्यार्थी मस्ती करतात, पालकांपर्यंत तक्रारी जातात, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

हेही वाचा : नाशिकमध्ये ‘वंचित’तर्फे करण गायकर उमेदवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२१०० रुपयांचे बक्षीस

प्रत्येक शिक्षकाने आपल्या शालेय परिसरात पट नोंदणीसाठी फिरून इयत्ता पहिली ते आठवीसाठी नवीन विद्यार्थी दाखल करायचे आहेत. ठराविक लोक सर्वेक्षण करतात. बरेचसे शिक्षक सर्वेक्षणाच्या नावाखाली आपली वैयक्तिक कामे करतात. असे आढळल्यास मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांनी त्यांची नावे कळवावीत, असे शिक्षणाधिकारी पाटील यांनी म्हटले आहे. यावर्षी प्रत्येक मनपा शाळेचा इयत्ता पहिलीसाठी पट वाढणे गरजेचे आहे. ज्या शाळांचा पट वाढणार नाही, अशा शाळांची नोंद घेतली जाईल. प्रत्येक शिक्षकांनी किती विद्यार्थी दाखल केले, याच्या याद्या प्रशासनाकडे सादर कराव्यात. मनपा शाळांमध्ये जी शाळा मागील वर्षापेक्षा इयत्ता पहिलीसाठी दुप्पट विद्यार्थी दाखल करेल, त्या शाळेला शिक्षणाधिकाऱ्यांकडून २१०० रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.