नाशिक : इगतपुरी तालुक्यात ५२ वर्षाच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर शारीरिक अत्याचार केला. या प्रकरणी मुख्याध्यापकासह त्याला मदत करणाऱ्या शिक्षकाला घोटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इगतपुरी तालुक्यातील एका शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या १३ वर्षाच्या मुलीला शुक्रवारी संशयित मुख्याध्यापकाने वर्गशिक्षकाच्या मदतीने घरी बोलावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्याध्यापकाच्या घरातील अन्य सदस्य लग्नानिमित्त बाहेर गेले होते. याचा फायदा घेत मुख्याध्यापकाने मुलीवर शारीरिक अत्याचार केला. मुलगी घरी पोहचल्यावर तिने पालकांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी घोटी पोलीस ठाणे गाठत दोघा संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी मुख्याध्यापकासह शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. तालुका दौऱ्यावर असलेले शिक्षण मंत्री दादा भुसे यांना याप्रकरणी ग्रामस्थ तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले. शनिवारी या घटनेच्या निषेधार्थ संबंधित गावात बंद पाळण्यात आला.

दरम्यान, या घटनेची दखल घेत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दोन्ही संशयितांना सेवेतून निलंबित करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिल्यानंतर दोघांना त्वरीत निलंबित करण्यात आले. संशयितांविरुध्द कठोर कारवाई करण्याचे निर्देशही पोलीस अधीक्षकांना भुसे यांनी दिले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In igatpuri 52 year old headmaster assaulted minor teacher and principal detained sud 02