जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सातत्याने नवीन उच्चांक करत असलेल्या सोने आणि चांदीने मंगळवारी मोठा धमाका केला. दोन्ही धातुंच्या दराने घेतलेली उसळी लक्षात घेता ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.
जागतिक बाजारपेठेतही मंगळवारी सोन्यासह चांदीने चांगली उसळी घेतली. स्पॉट सोन्याचा दर तब्बल दोन टक्क्यांनी वाढून ३,९४९.५८ डॉलर प्रति औंस या ऐतिहासिक स्तरावर पोहोचला. चांदीचा दर एक टक्क्यांपेक्षा अधिक वाढून ४८.७५ डॉलर प्रति औंस झाला. हा वाढीचा कल मुख्यतः अमेरिकन सरकारच्या शट डाऊनच्या सहाव्या दिवशी निर्माण झालेल्या आर्थिक अनिश्चिततेमुळे पाहायला मिळाला.
तज्ज्ञांच्या मते, सोन्याचा भाव पहिल्यांदाच ३,९४० डॉलर प्रति औंसवर गेला असून, हा स्तर गुंतवणूकदारांच्या सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे वाढत्या कलाचा पुरावा आहे. अमेरिकेतील सरकारी कार्यालये बंद राहिल्याने आणि आर्थिक धोरणांवरील अनिश्चितता वाढल्याने डॉलर थोडासा कमकुवत झाला, ज्याचा थेट फायदा सोन्या-चांदीसारख्या धातुंना झाला.
आंतरराष्ट्रीय बाजारात यू. एस. ट्रेझरी बाँडवरील उत्पन्न दरात घसरण झाल्यानेही सोन्याला आधार मिळाला आहे. गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैसा काढून सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढवली आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, जर अमेरिकेतील शट डाऊन आणखी काही दिवस चालू राहिला, तर सोन्याचा भाव पुढील आठवड्यांत ४,००० डॉलर प्रति औंसच्या वर जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणाव आणि चीनकडून वाढती मागणी यामुळेही सोन्याच्या दरात स्थैर्य राहील, असेही मत व्यक्त केले जात आहे.
जळगाव शहरात सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २३ हजार ८०६ रूपयांच्या उच्चांकावर होते. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा ८२४ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याने जीएसटीसह एक लाख २४ हजार ६३० रूपयांचा नवीन उच्चांक केला. जळगावमध्ये सोने एक तारखेला जीएसटीसह एक लाख २१ हजार ७४६ रूपयांपर्यंत होते. त्यात २८८४ रूपयांची गेल्या सहा दिवसात झाल्याचे दिसून आले.
चांदीत १०३० रूपयांनी वाढ
शहरात सोमवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५५ हजार ५३० रूपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीने एक लाख ५६ हजार ५६० रूपयांचा नवीन उच्चांक केला. जळगावमध्ये चांदी एक तारखेला जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५३ हजार ४७० रूपयांपर्यंत होती. त्यात गेल्या सहा दिवसात ३०९० रूपयांची वाढ झाल्याचे दिसून आले.