नाशिक: श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्यावतीने पहिल्या रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कारासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांची निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नाशिक नगरीत येणाऱ्या स्वामी गोविंददेवगिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गंगा गोदावरीची महाआरती करण्यात येणार आहे.

या पुरस्काराची माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष श्रीनिवास लोया, स्वागताध्यक्ष धनंजय बेळे आणि सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. गोदाकाठावर ३१ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता या पुरस्काराचे वितरण विश्व मांगल्य सभाचार्य आचार्य जितेंद्रनाथ महाराज, इस्कॉनच्या संचालन समितीचे सदस्य गौरांग प्रभू आणि होळकर घराण्याचे वंशज यशवंत होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने महाआरतीबरोबर विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्या अंतर्गत पहिल्या रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्काराची घोषणा करण्यात आली. स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि थैली असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या कार्यक्रमासाठी ३० आणि ३१ मे असे दोन दिवस गोविंददेवगिरी महाराज नाशिकमध्ये राहणार आहेत. पहिल्या दिवशी सायंकाळी त्यांच्या उपस्थितीत महाआरती होईल. त्यानंतर त्यांचा रामसंदेश रामकथेचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या दिवशी ३१ मे रोजी महाराजांच्या अमृत महोत्सवानिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी श्री गंगा गोदावरी आरती आणि नंतर पुरस्कार वितरण व नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : नाशिकमध्ये मतपत्रिकेत नाव वरती येण्यासाठी उमेदवारांची धडपड

गोदावरी महाआरती उपक्रम अडीच महिन्यांपासून सुरू असून त्यामुळे गोदावरी काठावरील चित्र बदलले आहे. या उपक्रमात अनेक जण सहकुटुंब सहभागी होत आहेत. राज्यातील वेगवेगळ्या भागातील युवक, संस्था आरतीसाठी समितीचे मार्गदर्शन घेत आहेत. प्रकाशा येथील युवकांनी समितीची स्थापना करून तापी नदीच्या आरतीचे नियोजन केले आहे. वाई येथून आरतीच्या दृष्टीकोनातून माहिती घेतली गेली. मुंबईतून झालेल्या मागणीनुसार समितीच्या सदस्यांनी तिकडे जाऊन बाणगंगेची आरती केल्याची माहिती सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, सचिव मुकुंद खोचे यांनी दिली.अक्षय्यतृतीयेच्या दिवशी सायंकाळी सहा ते साडेसहा या कालावधीत गोदावरी काठावर अक्षय साधना उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.