नाशिक : देवळाली विधानसभा मतदारसंघात संपर्क मोहीम राबवत निवडणुकीची तयारी करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार (सामान्य प्रशासन) डॉ. राजश्री अहिरराव यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव दिलेला राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. राजकीय क्षेत्रात उतरण्याबाबत योग्यवेळी निर्णय घेईल, असे त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवळाली विधानसभा मतदारसंघात तहसीलदार डॉ. अहिरराव यांनी काही वर्षांपासून सामाजिक उपक्रमांची श्रृंखला सुरु केली. या कार्यक्रमामुळे मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्याशी त्यांचे बिनसले. अहिरे यांच्या समर्थकांकडून तहसीलदारांच्या कार्यक्रमांविषयी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्या होत्या. मागील विधानसभा निवडणुकीत डॉ. अहिरराव राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होत्या. परंतु, तेव्हा उमेदवारी न मिळाल्याने त्या शासकीय सेवेत कार्यरत राहिल्या. या काळात त्यांनी देवळाली मतदारसंघात पध्दतशीरपणे प्रचार सुरू केल्याचा त्यांच्यावर आरोप केला जातो.

हेही वाचा : लाचप्रकरणी पाटबंधारे अधिकाऱ्यास सक्तमजुरी

हेही वाचा : “ललित पाटील प्रकरणात चौकशीला सहकार्य करु”, विनायक पांडे यांचे आश्वासन

शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ गतवेळी राष्ट्रवादीने खेचून घेतला होता. सध्या महायुती सरकारमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे (अजित पवार गट) आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपला या मतदारसंघातून संधी मिळणार नाही. राष्ट्रवादी नवा चेहरा शोधण्याऐवजी विद्यमान आमदार अहिरे यांना संधी देण्याची चिन्हे आहे. या एकंदर राजकीय स्थितीत शासकीय नोकरीचा राजीनामा देणाऱ्या डॉ. अहिरराव यांच्यासमोर शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) असे पर्याय आहेत. दरम्यान, आपण वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला असून तो अद्याप मंजूर झाला नसल्याचे डॉ. अहिरराव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. निवडणुकीच्या रिंगणात अर्थात राजकारणात येण्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. योग्यवेळी त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik tehsildar dr rajashri ahirrao resign to enter in politics css