नाशिक : शेअर बाजारातील गुंतवणुकीत १६ लाख रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याने नैराश्यातून येथे २८ वर्षाच्या युवकाने बुधवारी अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतले. गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. चांदवड तालुक्यातील विटाई हे मूळगाव असलेला आणि कामानिमित्त नाशिक येथे आलेला राजेंद्र कोल्हे (२८) हा एका खासगी गुंतवणूक कंपनीत कामाला होता. गावी आईवडिलांना पैसे न पाठविता इतर मित्रांप्रमाणे मिळणाऱ्या पगारातून त्याने शेअर बाजारात पैसे गुंतविण्यास सुरूवात केली. ही गुंतवणूक काही दिवसांपूर्वी १६ लाख रुपयांपर्यंत पोहचली. परंतु, शेअर बाजार कोसळल्याने राजेंद्र यास मोठा फटका बसला. नंतर नोकरी बदलून तो मायको सर्कल येथील एका खासगी बँकेत काम करु लागला. शेअर बाजारातील नुकसानीमुळे त्याला नैराश्य आले होते. त्यातच अनेकांची देणी बाकी होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी महाशिवरात्रनिमित्त सुट्टी असल्याने त्याने त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. परत येताना दुपारी तीनच्या सुमारास पिंपळगाव बहुला येथील ज्योती विद्यालयाच्या मोकळ्या आवारात त्याने दुचाकी थांबवत दुचाकीवरच बसून अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी सातपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी दुचाकी खाक झाली होती. राजेंद्रही ९० टक्के भाजला होता. पोलिसांनी मागवलेली रुग्णवाहिका एक तासानंतरही न आल्याने पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्याला चादरीत लपेटून पोलीस वाहनातच जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्री उशीरा राजेंद्रचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik youth committed suicide due to loss in share market css