जळगाव : शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण महामार्गामुळे वाहतूक कोंडीची समस्या निकाली निघाली आहे. या शिवाय उत्तरेला नवीन जळगाव वसण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, भविष्याचा वेध घेऊन अनेक नवे प्रकल्प आता बाह्यवळण महामार्गालगतच्या शेतांमध्ये सुरू करण्यास येत आहेत. ज्यामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
जळगाव शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण महामार्गालगतच्या पाळधी, बांभोरी, भोकणी, आव्हानी, आव्हाणे, ममुराबाद, आसोदा आणि तरसोद या काही गावांमधील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरूण तसेच शेतकरी कृषी आधारित प्रक्रिया उद्योग आणि विविध उद्योग-व्यवसाय सुरू करण्यास उत्सुक आहेत.
या परिसराला औद्योगिक विकासाची मोठी संधी असल्याने संबंधित शेती शिवाराचे बिनशेतीकरण झाल्यास आणि राज्य शासनाच्या २०२३ च्या औद्योगिक धोरणानुसार ‘डी प्लस’ दर्जा मिळाल्यास येथे सोलर, आयटी पार्क आणि अन्नप्रक्रिया उद्योगांसह अनेक लघु-मध्यम उद्योग उभारले जाऊ शकतील. त्या अनुषंगाने बाह्यवळण महामार्गालगतच्या गावांमध्ये औद्योगिक वसाहतींच्या निर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी शासनाकडे आधीच केली आहे.
बाह्यवळण महामार्गालगतच्या गावांमधील शिवाराला बिनशेतीकरणासह डी प्लस दर्जा मिळाल्यास त्या भागात अन्न प्रक्रिया उद्योगांसह सोलर तसेच आयटी पार्क सुरू होतील. मात्र, त्यासाठी एकत्रित ५० ते ६० शेतकऱ्यांनी जमिनी देण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आमदार भोळे यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील १५ पैकी १० तालुके यापूर्वीच औद्योगिक सवलतीच्या डी प्लस झोनमध्ये समाविष्ट होते. त्यानंतर आता जळगावसह अमळनेर, चाळीसगाव, धरणगाव आणि यावल या तालुक्यांचाही त्यात समावेश झाला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात नव्याने सुरू होणाऱ्या उद्योगांना आगामी १० वर्षांसाठी राज्य वस्तू व सेवा करामधून १०० टक्के परतावा मिळू शकेल. विस्तार करणार्या जुन्या उद्योगांनाही नऊ वर्षांसाठी सदरचा परतावा मिळेल. याशिवाय, मुदत कर्जावर पाच टक्के व्याज परतावा, वीज दर आणि वीज वापरावर सवलत, वीज शुल्क माफी मिळेल. पायाभूत सुविधा व नवीन औद्योगिक वसाहतीच्या उभारणीला गती येईल.
दरम्यान, जळगाव शहराच्या सभोवती जमिनींचे भाव आधीच गगनाला भिडले आहेत. त्या तुलनेत बाह्यवळण महामार्गामुळे नव्याने विकसित होत असलेल्या शहराच्या उत्तर भागात अजुनही जमिनींचे भाव बऱ्यापैकी आवाक्यात आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांसह विकसकांचा ओढा या भागाकडे वाढला आहे. ज्यांनी यापूर्वीच कमी भावात जमिनी खरेदी करून ठेवल्या होत्या, त्यांनी त्या ठिकाणी आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यास आता सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. निसर्गरम्य वातावरणात गर्दी आणि गोंगाटापासून लांब खासगी कार्यक्रम साजरे करण्याचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खास व्यवस्था म्हणून लॉन उभारण्यावरही काहींनी भर दिला आहे. ज्यामुळे संपूर्ण परिसराचा हळूहळू कायापलट होत असल्याचे चित्र आहे.
