चारुशीला कुलकर्णी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी अशी शेखी मिरवणाऱ्या त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आधारतीर्थ आश्रमात बालकल्याण समितीसमोर आतापर्यंत सादर झालेल्या ३५ बालकांमधील एकही शेतकरी कुटुंबातील नसल्याचे उघड झाले आहे. आधारतीर्थ आश्रमात चार वर्षाच्या बालकाच्या खुनानंतर पोलिसांनी आश्रमातील १०० हून अधिक बालकांना शासकीय आश्रमात हलविले आहे. धास्तावलेली बालके आधारतीर्थातील वागणुकीबद्दल काही बोलण्यास तयार नाहीत. त्यांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना त्यांच्या स्वाधीन केले जात आहे.

हेही वाचा >>>नाशिक: सिन्नर तालुक्यातील अपघातात दोन भाविकांचा मृत्यू, दोन जण जखमी

नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्यालगतच्या एका टेकडीवर संजय गायकवाडने आधारतीर्थ आश्रम सुरू केला. या ठिकाणी राज्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची देखभाल करण्यात येत असल्याचा प्रचार त्याने केला. सुरूवातीला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य दाखल झाले. नंतर मात्र गायकवाडने त्र्यंबकसह अन्य भागातील गरीब, गरजु कुटूंब हेरत त्यांच्या मुलांना आश्रमात दाखल करून घेण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेल्यानंतर या मुलांच्या परिस्थितीचे भांडवल करत समाजातील दानशूर व्यक्तींकडून, लोकप्रतिनिधी, आश्रमाला भेट देणाऱ्या व्यक्तींकडून देणगी स्वरूपात पैसे मागण्यास सुरूवात केली. पैसै मिळावेत म्हणून वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मुलांना नेण्यात येऊ लागले.

हेही वाचा >>>नाशिक: भटक्या श्वानांच्या संख्या नियंत्रणावर शंका; शहरात ४५ हजार मोकाट श्वान असल्याचा अंदाज

काही दिवसांपूर्वी आश्रमातील चार वर्षाच्या आलोक शिंगारे याचा आश्रमातीलच १६ वर्षाच्या मुलाने गळा दाबत खून केला. या प्रकाराने सर्वच हादरले. आश्रमात पाल्य असलेले पालक धास्तावले. पोलिसांनी हा प्रकार घडल्यानंतर आश्रमातील १०० हून अधिक बालकांची सुरक्षितरित्या शासकीय आश्रमात रवानगी केली. बाल कल्याण समितीने आश्रमातील बालकांशी चर्चा करुन त्यांना काय त्रास होत होता, आश्रमातील एकंदर परिस्थिती कशी होती, याविषयी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. परंतु, बालक आश्रमात दिल्या जाणाऱ्या वागणुकी विषयी बोलण्यास तयार नाहीत. याविषयी महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्रमातील बालकांची चौकशी सुरू असून त्यांच्या पालकांशी संपर्क साधण्यात येत असल्याचे सांगितले. आतापर्यंत ३५ बालकांची बालकल्याण समितीने चौकशी केली असून त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यातील एकही बालक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे नाही.

या आश्रमास महिला व बालकल्याण विभागाची मान्यता नाही. दुसरीकडे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी असे भांडवल करत गायकवाड हा लोकांक़डून पैसे उकळत होता. शासनासह अन्य लोकांची फसवणूक करणाऱ्या आधारतीर्थ आश्रमावर महिला बाल विकास विभागासह पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is revealed that none of the children in aadhartirtha ashram are from the family of farmers who committed suicide amy