जळगाव : शहरातील विमानतळाला राज्यात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या विमानतळाचा मान मिळाला आहे. या ठिकाणची सेवा आणखी गतीमान करण्यासाठी केंद्र सरकारने तांत्रिक व आर्थिक साहाय्य उपलब्ध करावे, अशी मागणी खासदार स्मिता वाघ यांनी केली होती. त्यानुसार, विमानतळ विस्ताराकरीता आता सुमारे ३० कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यातून बरीच विकासकामे वर्षभरात केली जाणार आहेत.
जळगाव विमानतळावरून सद्यःस्थितीत गोवा, हैदराबाद, पुणे, मुंबई शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. याशिवाय हवाई प्रशिक्षण केंद्र चालविले जात आहे. भविष्यात अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या प्रवाशांसाठी जळगावचे विमानतळ खूपच सोईचे ठरणार आहे. मात्र, सध्या जळगाव विमानतळाचे कामकाज फक्त एकाच पाळीत चालत आहे. इतर आवश्यक भौतिक सुविधा नसल्याने प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. या अनुषंगाने जळगाव विमानतळाच्या विकासासाठी तांत्रिक व आर्थिक साहाय्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खासदार स्मिता वाघ यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांच्याकडे केली होती. तसेच शहरातील विमानतळाचा विस्तार आणि सुविधा वाढवण्याबाबत केंद्रीय नागरी विमानन मंत्रालयाकडे त्यांनी पाठपुरावा केला होता.
धावपट्टीच्या लांबीत वाढ करण्यासह विमानसेवेच्या फेऱ्या आणि एकुणच विमानतळाची क्षमता वाढवण्याच्या मागणीकडे खासदार वाघ यांनी केंद्राचे लक्ष वेधले होते. विमानतळावर उत्तम हवाई सुविधा मिळाल्यास जळगाव आणि परिसरात नवीन गुंतवणुकदार येण्यास प्रोत्साहन मिळेल. पर्यटन क्षेत्रालाही नवी दिशा मिळेल. जळगावसारख्या वाढत्या शहराला सक्षम विमानसेवा असणे गरजेचे असल्याचे खासदार वाघ यांनी म्हटले होते. त्यांच्या त्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
सुमारे ३० कोटींच्या निधीतून विमानतळावर विविध विकास कामांना आगामी काळात चालना देण्यात येणार आहे. ज्यामाध्यमातून दोन एटीआर ७२ आणि एक लेगसी ६५० विमानाची पार्किंग होऊ शकेल अशा ॲप्रनचा विस्तार केला जाणार आहे. तसेच आधुनिक सोयी सुविधांनी युक्त टर्मिनल इमारत, १५० प्रवाशी क्षमतेची बैठक व्यवस्था, टर्मिनल इमारतीसमोर १०० मोटारींचा वाहनतळ, आगमन सभागृहात प्रवाशांनी बरोबर आणलेले सामान जमा करण्यासाठी कन्व्हेयर बेल्ट, वैद्यकीय तपासणी कक्ष, अतिरिक्त चेक-इन काऊंटर, खाद्य पदार्थांची दुकाने तसेच बालसंगोपन कक्षाची निर्मिती केली जाणार आहे.
कार्गो टर्मिनलसाठी पाठपुरावा
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विमानाद्वारे कमी खर्चात शेती माल पाठविण्याच्या योजना सुरू केल्या आहेत. परंतु, सध्या जळगाव विमानतळावर स्वतंत्र माल वाहतूक (कार्गो) विमानसेवा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशी विमानांद्वारे मर्यादित प्रमाणात मालाची वाहतूक केली जाते. नवीन कार्गो टर्मिनल सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना शेती मालाची निर्यात मोठ्या प्रमाणात करता येणार आहे. त्यादृष्टीनेही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या कृषी उडान योजनेत देशभरातील ५८ विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रातील नाशिकसह पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर आणि जळगाव विमानतळांचा देखील समावेश आहे.
