जळगाव – जिल्ह्यातील हजारो प्रवासी नोकरी, व्यवसाय तसेच शिक्षणासाठी दररोज पुण्याकडे ये-जा करतात. विशेषतः दिवाळीच्या काळात एसटी, खासगी निमआराम बसेस आणि रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते. या पार्श्वभूमीवर, प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता मध्य रेल्वेने जळगाव-भुसावळमार्गे पुण्यासाठी आणखी एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
फ्लाय ९१ या विमान कंपनीने गोवा, हैदराबाद आणि जळगाव यांना थेट हवाई सेवेने जोडून प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध करून दिली. या सेवेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर जळगावकरांकडून पुणे मार्गावरही विमानसेवेची जोरदार मागणी करण्यात आली. त्याची दखल घेत फ्लाय ९१ कंपनीने जळगाव–पुणे विमानसेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे नोकरी, व्यवसाय, शिक्षण तसेच वैयक्तिक कारणांसाठी पुण्याकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दीर्घकाळाची गैरसोय संपुष्टात आली असून, संबंधितांमा मोठा दिलासा मिळाला आहे. तथापि, ही विमानसेवा आठवड्यातील काहीच दिवस उपलब्ध असल्याने तिचा लाभ मर्यादित प्रवाशांनाच मिळतो. अशा परिस्थितीत भुसावळ–पुणे दरम्यान धावणारी हुतात्मा एक्स्प्रेस प्रवाशांसाठी मोठा आधार ठरली होती. पण ही गाडीही आता भुसावळऐवजी अमरावतीहून धावत असल्याने जळगाव, भुसावळच्या प्रवाशांची गैरसोय वाढली आहे. याशिवाय, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या जळगावमार्गे पुण्याकडे धावत असल्या तरी त्यांना विशेषतः जळगावात थांबा नसतो. नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लाभ देखील मर्यादित आसन क्षमतेमुळे निवडक प्रवाशांनाच होताना दिसत आहे.
दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी आणि छठ पुजेचे निमित्त साधून मध्य रेल्वेने विविध ठिकाणांवरून एकूण ९४४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. या गाड्यांव्यतिरिक्त प्रशासनाकडून आणखी १८२ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यात जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या काही गाड्यांचा देखील समावेश आहे. प्रामुख्याने अमरावती-पुणे दरम्यान चालविण्यात येणारी गाडी जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी सोयीची ठरणार आहे. ०१४०३ साप्ताहिक विशेष गाडी सात ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक मंगळवारी पुणे येथून १९.५५ वाजता सुटेल आणि अमरावती येथे दुसऱ्या दिवशी १०.०५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण आठ फेऱ्या होतील.
याशिवाय, ०१४०४ साप्ताहिक विशेष गाडी आठ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक बुधवारी अमरावती येथून १२.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ००.१५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या सुद्धा आठ फेऱ्या होतील. चाळीसगावसह जळगाव आणि भुसावळ या स्थानकांवर दोन्ही बाजुने अमरावती-पुणे विशेष गाडीला थांबा देण्यात आला आहे. चार वातानुकूलित तृतीय, सहा शयनयान, सहा सामान्य द्वितीय, दोन सामान्य द्वितीय आसन व्यवस्थेसह ही गाडी धावेल.