जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर आणि जळगाव तालुक्यातून होणारी भरीताच्या वांग्यांची आवक पोषक हवामानामुळे वाढली आहे. या वांग्यांना किरकोळ बाजारात सध्या २० ते २५ रुपये किलोचा दर मिळत असून, ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी भरीताच्या पार्ट्यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्याची प्रथा रुढ झाल्याने वांग्यांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नववर्षाचे स्वागत सर्वत्र वेगवेगळ्या पध्दतीने केले जात असताना जळगाव जिल्ह्यात भरीतच्या पार्ट्यांचे आयोजन त्यासाठी आयोजित करण्यात येतात. या पार्ट्या हिवाळ संपेपर्यंत सुरु असतात. प्रतिकूल हवामान घटकांचा तसेच कीड व रोगांचा मोठा परिणाम भरीत वांग्याच्या उत्पादनावर होतो. पुरेशी आवक न झाल्याने बऱ्याचवेळा बाजारात भरीताच्या वांग्यांचा दर ५० ते ६० रुपये किलोपर्यंत पोहचतो. मात्र, यंदा पोषक हवामान असल्याने भरीताच्या वांग्यांचे उत्पादन सुरूवातीपासूनच चांगले आहे. काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तर वांग्यांचे उत्पादन आणखी जास्त वाढले आहे. परिणामी, ठोक व किरकोळ बाजारात भरीत वांग्यांची सध्या रेलचेल आहे. वांग्याचे दर बाजार समित्यांमध्ये १० ते १५ रुपये किलो, तर किरकोळ बाजारात २० ते २५ रुपये किलो प्रमाणे आहेत. याशिवाय जळगाव, भुसावळ शहरात मोठ्या संख्येने सुरू झालेल्या भरीत केंद्रांवर २४० रुपये किलोने तयार भरीत मिळत आहे. याशिवाय पुणे येथे पिंपरी, चिंचवड, सांगवी या भागात खान्देशातील मंडळी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असल्याने तेथेही जळगावातून भरीताची वांगी पाठवली जात आहेत. त्यामुळे तेथील बाजारातही खान्देशी भरीत वांगी भाव खात आहेत.

हेही वाचा…गिधाड संवर्धन केंद्राच्या बांधकामात निकृष्टपणा, ग्रामस्थांची नाराजी

थंडीमुळे भरीत पार्ट्यांच्या आयोजनात वाढ

जळगाव जिल्ह्यात हिवाळ्याच्या दिवसात खास भरीत पार्ट्या मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जातात. यंदाही थंडीचे प्रमाण वाढल्याने भरीत पार्ट्यांना सगळीकडे जोमाने सुरुवात झाली असून, नवीन वर्षाच्या स्वागताला अनेकांनी भरीत पार्टीचे नियोजन केले आहे. सध्या घरी आलेल्या पाहुणे मंडळींनाही आवर्जून भरीताचा पाहुणचार केला जात आहे. भरीत तयार करण्यासाठी लागणारी हिरवी मिरची, कांदा व लसूण पात, कोथिंबीर, मुळा या भाजीपाल्याच्या मागणीतही त्यामुळे वाढ झाली आहे. नियमित भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalgaon demand for brinjal increase organizing large scale bharita parties to welcome new year sud 02