जळगाव : शहरातील औद्योगिक वसाहतीत जी सेक्टरमध्ये अवैध दारू अड्ड्यावर एकाने केलेल्या गोळीबारात दोन तरूण कामगार जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. दोन्ही जखमी कामगारांवर जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

औद्योगिक वसाहतीत जी सेक्टरमध्ये विजेता इंडस्ट्रीज नावाच्या कारखान्यात प्लास्टिक चटईचे धागे बनविण्यासाठी लागणाऱ्या दाण्यांची निर्मिती होते. त्या ठिकाणी रात्रपाळीवर कामास असलेला कामगार सरकू शेख हा कारखान्यात जाण्यापूर्वी समोरच्या पान टपरीवर साधारण १०.१५ वाजता गुटख्याची पुडी घेण्यासाठी गेला होता. त्याच वेळी शेजारी अवैध दारूचा अड्डा चालविणारा राहूल बऱ्हाटे हा सराईत गुन्हेगार अन्य एका व्यक्तीला शिवीगाळ व मारहाण करत होता. सरकू शेख याने पाहिले म्हणून राहुलला राग आला आणि त्याने सरकू शेख यालाही मारहाण करण्यास सुरूवात केली.

मारहाण झाल्यानंतर सरकू शेख त्याच्याबरोबर कारखान्यात काम करणाऱ्या दोन्ही भावांना तसेच इतर कामगारांना बाहेर घेऊन आला. मात्र, त्यांनाही राहुल याने शिवीगाळ केली. या दरम्यान, एका महिलेने राहुलला गावठी बंदूक आणून दिली. ज्या माध्यमातून त्याने बेछुट सहा राऊंड फायर केले. राहुलच्या गोळीबारामुळे राजन शेख रफिउल्ला (२०) आणि अहमद फिरोज शेख (२६) हे दोन्ही कामगार गंभीर जखमी झाले. इतरांनाही दुखापती झाल्या. गोळीबाराच्या घटनेनंतर दोन्ही जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री उशिरा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. पुढील तपासाच्या दृष्टीने औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अचानक घडलेल्या गोळीबाराच्या घटनेची माहिती सगळीकडे पसरताच औद्योगिक वसाहतीत रात्रपाळीला काम करणाऱ्या कामगारांमध्ये खळबळ उडाली.

पत्रकारावर प्राणघातक हल्ला

शहरातील बळीराम पेठेत पत्रकार दीपक कुलकर्णी (४१) यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना रविवारी घडली. कुलकर्णी हे रस्त्याने पायी चालत जात होते. त्याच वेळी मागून दुचाकीवर आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्या मानेवर बियरची बाटली फोडली. तसेच फुटलेली बाटली त्यांच्या पोटात खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, वार चुकविण्यात यश आल्याने कुलकर्णी यांच्या जीवावर बेतलेले संकट टळले. चोपडा तालुक्यातील धानोरा येथील मूळ रहिवासी असलेले दीपक कुलकर्णी हे गेल्या २३ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणारे तिन्ही हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. आणि त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.